लहानपणी बाबांचा हात पकडून जाताना जोशी काका म्हणायचे “ काय assistant ? काय म्हणताय ?" असा प्रश्न विचारला की मुग्धाला मस्त वाटायचं . मुळात बाबांचा हात पकडून जाणंच तिला जाम आवडायचं. assistant म्हटलं कि तिला उगाच मोठं झाल्यासारखं वाटायचं. बाबा तिला कधी दुकानात, बाजारात तर कधी मित्रांकडे घेऊन जायचे. मोठ्या मोठ्या विषयांवरच त्यांचा बोलणं ऐकताना आपले बाबा काहीतरी वेगळे आहेत असं तिला जाणवत राहायचं. सत्प्रवृत्ती आणि सद्वर्तन या गोष्टी तिला कळायच्या नाहीत पण या गोष्टी तिच्यावर होणाऱ्या संस्कारांचा एक भाग होता हे तिला खूप नंतर कळलं.
रात्रीची सगळ्यांची जेवणं एकत्र व्हायची. वेगवेगळ्या विषयांवरच्या आई बाबांच्या चर्चा तिच्या कानावर पडत असत. तेव्हाही आपले आई बाबा फार ग्रेट आहेत असं तिला वाटत राहायचं. तिने कधी आई बाबांबरोबर बसून अभ्यास केला नाही पण ते दोघेही पुस्तकं वाचत असत तेव्हा ती पण आपल्या अभ्यास करत असे.
शाळेत सगळ्यांचे आई बाबा येतात , आपले का नाही येत? असं मुग्धाला नेहमी वाटायचं पण “ आतील सूत्रांकडून “ आपली प्रगती आणि वर्तन घरापर्यंत पोहोचतंय हे तिला नंतर कळलं. आणि तिला तिच्यासमोर मिस्किलपणे हसणारे बाबा दिसायचे. बाबांच्या डोळ्यातले भाव तिला न बोलता कळायचे. आई जरा बोलून दाखवायची पण अगदी मोजकं.
बाबांकडे त्यांचे विद्यार्थी यायचे. बाबा क्लास मध्ये कसे शिकवत असतील याचं तिला नेहमी कुतूहल वाटत असे. म्हणून ती त्याच्या क्लास मध्ये जाऊन बसे. अगदी लहान असताना तर चांगल्या पुस्तकांवर रेघोट्या पण मारत असे. पण बाबा कधी रागावत नसत. त्यांच्या विषयातली पुस्तकं लिहिलीत हेही तिला फार नंतर कळलं. कधी लिहिली असतील याचं तिला नेहमी आश्चर्य वाटायचं.
दसरा दिवाळीला नवीन कपडे घ्यायचे तेव्हा ती त्यांना बऱ्याच दुकानातून फिरवायची. ते पण तेवढ्या उत्साहाने फिरायचे. लहानपणी काही गमतीच्या जादू पण करीत. त्यांच्या आजूबाजूला वावरणाऱ्या लोकांना त्यांचा दरारा होता पण तिला कधी त्यांची भीती वाटली नाही. थोडा धाक होता.
" बेटी पढाओ बेटी बचाओ" वगैरे तेव्हा ते विचार करीत होते की नाही माहित नाही पण तिच्या नावानी बँकेत त्यांनी अकाउंट उघडून दिला होता आणि तिला ते अगदी शाळेत असल्यापासून operate करायला सांगत. शिक्षण हा एकच उन्नतीचा मार्ग आहे हे तिला खूप आधी कळून चुकलं होतं. त्यामुळे मैत्रिणींपेक्षा कमी कपडे असले तरी तिला त्याचं काही वाटत नसे. पण जेव्हा तिने न मागता तिला कॉलेजला जायला दुचाकी घेतली तेव्हा कोण आनंद झाला तिला.
कुठलंही बक्षीस घेऊन घरी गेलं की आई किती लोकांना सांगायची पण बाबांनी कधी तिच्यासमोर कौतुक केल्याचं तिला आठवत नाही. कधी मनासारखं नाही घडलं तर “ जाने दो आगे बढो ” एवढंच म्हणायचे. "अपना time आयेगा" हा त्यातला छुपा संदेश. तर " ऐसी जगह बैठं के कोई ना काही उठ" हा आईचा संदेश.
देवाची पूजा वगैरे करायचे. जप करायचे पण ” अध्यात्मात सजगता हवी “ असंही सांगायचे. आयुष्यात ” एक तरी ओवी अनुभवावी,जगावी “ असं म्हणायचे. व्यक्त होण्यासाठी नेहमी शब्दांची गरज असते हे म्हणणं खोटं ठरवून आपलं म्हणणं समोरच्यापर्यंत पोहोचवण्याचं कसबही त्यांना चांगला साधलं होतं. मुग्धा बडबडी. समोरच्याला कंटाळा येईपर्यंत बडबड करायची. " थोडे विचार स्वतःजवळही ठेव सगळ्यांना ते सांगायची गरज नाही" असं ते सांगायचे.
मुग्धा मोठी होत गेली. बाबांसारखीच शिक्षकी पेशात आली. क्लास वर जाताना आपल्या भात्यातले बाण नेहमी परजलेले असावेत. एक तास शिकवण्यासाठी किमान चार तासांची तयारी हवी हे " बाबा" वचन तिने कायम ध्यानात ठेवलं . आयुष्यात व्यक्ती पेक्षा ध्येय मोठं हे तिने मान्य केलं तरी " थोडं तरी बाबांसारखं होता आलं तर छान होईल" असं तिला वाटायचं.
आणखी जरा मोठी झाल्यावर मुग्धा संसारात रमली. मनीच्या विश्वात स्वतःला शोधायला लागली. मनी तिच्यापेक्षा बरीच वेगळी असली तरी थोडी तिच्यासारखी पण होती. तिला वाटायचं कि मनीला वाटत असेल का आपल्यासारखं व्हायला? इथली वर्तुळं एकमेकांना छेदतात की वेगळी वर्तुळं तयार होत जातात? वर्तुळच व्हायला पाहिजेत पण. समांतर रेषा नको तयार व्हायला.
ती विचार करायला लागली.. मनीचे बाबाही मनीबरोबर खूप भटकतात. तिचे हट्ट पुरवतात. मनी विचारांनी स्वतंत्र व्हावी म्हणून प्रयत्न करतात. तिची सगळी बडबड ऐकतात. तिच्याशी लहान होऊन खेळतात. सगळ्या जगापासून तिला प्रोटेक्ट करतात. तिच्या मनासारखं नाही घडलं तर "आगे बढो" म्हणतात. तिच्या लहान सहान गोष्टीचं कौतुक करतात.
कडेवरची मनी जेव्हा बाबाचा हात पकडून बाहेर जायला निघाली तेव्हा मनी ला बघून मुग्धा म्हणाली "काय assistant ? " जोशी काकांची हाक तिच्याही कानात घुमू लागली आणि तिला वाटलं आयुष्याला rewind button असतं तर ?