"तू लिहिती हो , तुला जमतंय ते " काकांचं म्हणणं होतं. " हे काय नवीनच?" कांचन विचार करायला लागली. मुद्दाम लिहायचं म्हणून आपण कधी लिहिलं नाही. किंवा आपण काही लेखिका नाही. की नेमक्या शब्दातच आपल्याला लिहिता येईल. आपलं म्हणणं मांडता येईल. एक्सप्रेस करता येईल. आपले विचार पण random आणि लिखाण पण. एका विचारानंतर दुसरा विचार इतक्या झपाट्याने काबीज करतो की सुसंगती हरवते.
थोडं मागे वळून बघताना तिला जाणवायला लागलं की लहानपणापासून आपल्याला वाचायला आवडतंय. शाळेच्या पुस्तकातले धडे वाचायला आवडत होतं. काही कविता तर कायम कोरल्याही गेल्या आहेत. शाळेतील बाईंनी मुद्दाम ते करवून घेतलं कि काय हेही कळत नव्हतं तिला. पण पुस्तकं वाचायची ती.
जरा आणखी मोठी झाल्यावर लिखाणामागचा विचार कळायला लागला तिला.
ते काय असतं जे आपल्याला खिळवून ठेवतं एका जागी. प्रवास वर्णन पण सोडवत नाही. between the lines की काय म्हणतात ते तिला जास्त appreciate होत होतं.
तुझा ब्लॉग सुरु कर , जमेल तुला ". श्री ने तिला सांगितलं . मग हळू हळू सुरु झालं लिहिणं . पेन आणि कागद घेऊन बसली सुरुवातीला. पण काही सुसंबद्ध जमत नव्हतं . झोपाळ्यावर जाऊन बसली. बीचवर जाऊन बसली. पण कसलं काय. एवढे विचार एरवी डोक्याचा भुगा करतात आणि आता मांडताच येत नाहीत.
" वाईट साईट " किंवा नकारात्मक विचार नकोतच मांडायला". कोणी आपल्याला त्यावरून judge केलं तर? मग तर अजूनच पंचाईत. सगळं गुडी गुडी कसं लिहायचं पण ? आपण खरंच वाईट विचार करतो का? आपलं लिखाण कुणाला आवडेल का? खूप पर्सनल होईल का? स्वतःशीच वाद घालत राहिली ती. याचं आपल्याला pressure येतंय का? पहिलीच कलाकृती सगळ्यांना आवडली पाहिजे .. .त्यातलं व्याकरण सांभाळलं गेलं पाहिजे ... भाषा अगदी पुस्तकी नसावी पण अगदी बोलीभाषा नसावी. कित्ती ती घालमेल..
आधी तिने हे मळभ दूर केलं आणि पहिला ब्लॉग लिहिला ..असंख्य चुका. पण "माझं "काहीतरी आहे हा फीलच मस्त होता. जितक्या लोकांना फॉरवर्ड करता येईल तितक्या सगळ्यांना केलं .कंमेंट्स ची वाट पाहत राहिली. तिने स्वतःच कित्येकदा वाचलं ते, त्यातल्या चुकांसकट.
एक एक वाक्य लिहिताना किती संघर्ष करावा लागतो. आधी आपला विचार, विचाराची सुसंगती आणि ती योग्यप्रकारे मांडणं आणि मुख्य म्हणजे ते जसं अभिप्रेत आहे तसंच वाचणाऱ्यालाही कळणं. इतकी मोठी process आहे ती. या प्रवासात आजूबाजूच्या अनेक गोष्टींचा विचार वेगळ्या पद्धतीने केला जातो. "मनभरून" झालेल्या गोष्टी नेमकेपणाने लिहायच्या आणि त्याही "नेटके तेच लिहावे " असा विचार करून. कठीणच आहे सगळं. आपण लिहिलेला शब्द त्या भावनेसकट इतरांपर्यंत पोहोचवायला वेगळाच रियाज लागतो. तरी ते पोहोचेलच याची खात्री नाही. प्रत्येक वेळी सूर सापडेल असंही नाही आणि सापडलेला सूर समोरच्याला भिडेलच असंही नाही.
मग जरा निवांत वेळ मिळाला की ती काहीतरी लिहीत असे. थोडं व्यक्तिचित्रण पण करायला लागली. पेन आणि कागदाशी गट्टी जमत गेली. कॉलेज मध्ये असताना पेपर्स सोडवतानाच पेन आणि कागद एकत्र यायचे. आता त्यातून अनेक अर्थ निर्माण होतात. आयुष्यातल्या अनेक गोष्टींकडे त्रयस्थाप्रमाणे बघण्याचा नादच लागतो. संसार, मुलं, शिक्षण, नोकरी हे सगळं सांभाळताना आपण जे उरतो स्वतःसाठी तेच आपलं आयुष्य .. अगदी स्वतःचं असं. त्यात आपल्याला जे जाणवतं ते पेन आणि कागदावर उतरतंय की आपण जे लिहितोय ते अजून काही वेगळंच आहे.
अशी विचारांची शृंखला असतानाच पाऊस पडायला लागला आणि कांचनने झोपाळ्यावर बसून पेन आणि कागद हातात घेतलं आणि "आपलं आभाळ" त्यावर उतरवायला लागली.