" " तू माझा सगळ्यात लाडका विद्यार्थी आहेस. या क्षेत्रात आला असतास तर नक्की नाव कमावला असतंस " सातत्याने केलेल्या कलेच्या जपणुकीचं सार्थक झाल्यासारखं वाटलं निमिषला. गुरुपौर्णिमेला मिळालेली ही पावती. मनातून गुरूंना त्याने नमस्कार केला आणि हे गुरूने स्वतः सांगणं यात त्यांच्या मनाचा किती मोठेपणा आहे हे त्याला जाणवलं. जे शब्द ऐकण्यासाठी शिष्य आपले आयुष्य पणाला लावतो तो क्षण त्याच्या आयुष्यात आला. तो भरून पावला.
कला कशासाठी? केवळ लोकांसमोर मांडण्यासाठी? प्रसिद्धी मिळवण्यासाठी? चरितार्थ चालवण्यासाठी? हे सगळे टप्पे असू शकतात पण मुळात अंतर्बाह्य आनंद निर्माण करण्यासाठी कला असावी. त्याने सगळं आयुष्य उजळून जावं. अखंड सकारात्मकता यावी. जे निर्गुण रूप चराचरात व्यापलं आहे ते शोधता यावं. सात सुरांतून निर्माण होणारी जादू सतत अनुभवता यावी.
विचार करता करता त्याचं मन त्याच्या गावात गेलं आणि त्याचे शाळेचे दिवस आठवले. घरी संगीताचं वातावरण होतंच. त्याने त्यांच्याकडे पेटी शिकायला सुरुवात केली. एक उत्तम शिक्षक म्हणून घोषबाबूंना तेव्हा संगीत क्षेत्रात फार वरचं स्थान होतं. अजूनही आहे. कडक शिस्तीचे पण शिष्याला भरभरून देणारे असे शिक्षक लाभणं म्हणजे भाग्यच.
निमिषने संगीतात रमावं, करिअर करावं असं घोषबाबूंना नेहमी वाटायचं. त्याचा हात छान होता. संगीताची
जाण होती. मेहनतीची तयारी होती. अतिशय प्रेमाने त्यांनी त्याला शिकवलं. तेव्हापासूनच केवळ हौस म्हणून हे करायचं नाही तर passion म्हणून करायचं इतकंच त्याने ठरवलं होतं. Profession म्हणून करण्याबाबत तो आग्रही नव्हता
कामाच्या व्यापात असतानादेखील निमिषने आपली साधना अखंड ठेवली होती. नवनवे प्रयोग करून तो त्यातून समाधान मिळवत असे. जसे संगीतातले गुरु तसेच त्याच्या profession मध्ये पण अनेक मार्गदर्शक त्याला लाभले. प्रत्येक गुरुपौर्णिमेला निमिष त्याच्या आयुष्याला वळण देणाऱ्या व्यक्तींना आवर्जून फोन करायचा. त्यांची आस्थेने चौकशी करायचा. कृतज्ञता व्यक्त करायचा. घोषबाबूंना तर पहिला फोन असायचा. प्रेमपूर्ण आशीर्वाद द्यायचे ते त्याला आणि नवीन काय केलं , काय शिकला याबद्दल सतत चौकशी करायचे. गावी गेलं की तो त्यांच्याकडे आवर्जून जायचा.
या गुरुपौर्णिमेच्या दोन दिवस आधी याने एक गाणं पेटीवर वाजवलं. त्या वाजवण्यामध्ये
नजाकत तर होतीच पण घोषबाबूंनी घालून दिलेल्या वाटेवर चालून त्याने ते गाणं उत्तम
वाजवलं आणि घोषबाबूंना पाठवलं गुरुदक्षिणा म्हणून. ते ऐकून ते नकळत उद्गारले "वाह क्या
बजाया है..".
त्याने इतकी वर्ष कुठलीही अपेक्षा न ठेवता जी साधना त्याच्यापुरती सातत्याने केली त्याची पावती त्याला मिळाली आणि दुप्पट उत्साहाने तो मेहनत करायला लागला.