
पावती
July 9, 2020
एक कृष्ण हवाच…
August 15, 2020आज एक डॉक्टरांचं lecture ऐकलं . त्यात त्या स्पर्शाचं महत्व सांगत होत्या . मानवी आयुष्याच्या वेगवेगळ्या स्टेजेस मध्ये निरनिराळ्या स्पर्शाची त्याला जाणीव होते. ती त्याला त्या त्या अवस्थेत हवीहवीशी वाटते. तान्ह्या बाळाला आईचा स्पर्श ओळखता येतो. त्या आईचा स्पर्श त्याला सांगतो " मी आहे तुझ्याबरोबर या जगात". त्याच्या वाढीसाठी तो स्पर्श आवश्यक असतो. रस्त्यावरून चालत असताना लहान मूल आई किंवा बाबांचं बोट धरून चालतं. त्या बोटाचा स्पर्श त्याला सांगतो" तू माझ्याबरोबर सुरक्षित आहेस". तरुणावस्थेत प्रियकर/प्रेयसीचा स्पर्श हवाहवासा वाटतो. आशीर्वादासाठी असलेल्या पाठीवरच्या हाताचा स्पर्श सांगतो" तू यशस्वी होणार आहेस". म्हातारपणी देखील आई वडिलांना आपल्या मुलांचा केवळ एक आश्वासक स्पर्श हवा असतो. तो सांगतो " तुम्ही एकटे नाही आहात ".
ज्यांच्याकडे काही पाळीव प्राणी असतात त्यांचं तर सगळं संभाषणच स्पर्शाने होतं. घरातला कुत्रा बाहेरून आलेल्या मालकाला सळो की पळो करून सोडतो. तेच मांजर, पोपट, ससा यांच्या बाबतीत. एखादी परंपरागत चालत आलेली वस्तू . त्याचा स्पर्श आवडतो आपल्याला. आमच्याकडे माझ्या सासऱ्यांच्या एक अडकित्ता आहे. आम्ही कुणीही तो वापरात नाही पण तो अडकित्ता आणि त्याचा स्पर्श त्यांची आठवण करून देतात. माझ्या वडिलांनी एक पोथी दिलीये. ती हातात घेतली की त्याच्या अस्तित्वाची जाणीव होते. माझ्या वडिलांची जपाची माळ माझ्या बहिणीने तिच्याजवळ ठेवलीये. तिला त्यातून त्यांनी केलेल्या जपाचा स्पर्श होतो.
हे सगळे पण प्रत्यक्ष होणारे किंवा वस्तूंचे स्पर्श. परंतु कधी कधी कोण्या एखाद्या व्यक्तीचा आपल्या आयुष्यावर परिणाम होतो. कोणी आपले आदर्श असतात. कुणाबद्दल अपार प्रेम असतं प्रत्यक्ष भेटलं नाही तरी. त्यांच्यातला काही गुणांचा, चांगुलपणाचा स्पर्श आपल्याला होतो. तो आपलं जीवन उजळून टाकतो. आयुष्याला दिशा देतो. अनेक संत त्यांच्या रचनांमधून आपल्या मनाला स्पर्श करतात. ते जे स्पर्श होतात ते ज्याचे त्यानेच अनुभवायचे असतात.
ते विचारांचे, आचारांचे स्पर्श जास्त जाणिवा जागृत करतात. कधी कधी कुणाशी फोन वर सुद्धा बोलत असताना सहज एखादा विचार आपल्याला स्पर्शून जातो. जे अव्यक्तपणे स्पर्शून जातं ते आणखी परिणामकारक असतं. आमचे एक काका आहेत. अतिशय सकारात्मक विचार करतात ते. त्यांना फोन केला तर नेहमी एक ऊर्जा मिळते. माझी एक मैत्रीण आहे. तिच्याशी बोललं की नेहमी आश्वासक वाटतं.
माझ्या काही पूर्व पुण्याई मुळे माझ्या आयुष्यात स्वरांचा स्पर्श झालेला आहे. तो प्रत्यक्ष गळ्यातून निघत असला तरी तो सर्व व्यापी आहे. त्याचं अस्तित्व सतत आस पास असतं. अनेक जणांनी गाऊन ठेवलेल्या अनेक चीजा, गाणी, गझल्स कितीतरी अंगांनी वेढून टाकतात. पाठलाग करतात. अस्वस्थ करतात. एखादी सुरावट गळ्यातून निघताना प्रत्यक्ष तालमींबरोबरच अनेकांच्या गाण्यातून त्याला झालेला स्पर्श आनंद देऊन जातो.
अव्यक्तातून व्यक्त होण्याचं कसब या स्वरांमध्ये असतं. म्हणूनच लताबाईंची गाणी ऐकताना, मेहदी हसनजींची गझल ऐकताना, भीमसेनजींच्या अभंग ऐकताना, अनेक गायक-गायिकांच्या बंदिशी ऐकताना रोमांच येतं ते या स्वर-स्पर्शामुळेच. नीट जुळलेला तानपुरा ऐकताना हा स्वर-स्पर्श जाणवतो. माझ्या दृष्टीने प्रत्यक्ष होणाऱ्या स्पर्शाबरोबरच हे अप्रत्यक्ष abstract स्पर्श तितकेच महत्वाचे, प्रेरणादायी आणि जीवनोत्सुक आहेत.




