काल रात्री झोपताना " उद्या अगदी केलीच पाहिजेत" अशा कामांची यादी मितालीने बनवून ठेवली होती. आपण हल्ली खूप पुढे ढकलत जातो गोष्टी.
सकाळी चहाचा कप हातात घेऊन ती गॅलरीत आली. तिचा प्राणापेक्षाही प्रिय असा virtual मित्र बरोबर होताच. पहिले WA बघणं अत्यंत गरजेचं आहे ."कराग्रे वसते.."..विसरायलाच झालंय. रोज न चुकता "गुड मॉर्निंग " चे संदेश पाठवणाऱ्यांबद्दल तिच्या मनात अपार माया दाटून आली. तिनेही अगदी नकळत "गुड मॉर्निंग " केलंच. खरं तर बाहेत नुकतं उजाडत होतं. प्रत्येक जण आपली "लय" पकडू बघत होता. तिचा आधी हा विरंगुळा होता , "काय विचार करत असेल ती बाई walk घेताना? ". "देशपांडे आजोबांचा कुर्ता छान आहे आजचा" , "जेनी चे shoes नवीन आहेत वाटतं " असले संवाद ती स्वतःशीच करत असे. पण आता जग हातातच असतं. गॅलरी बाहेर डोकावायची गरजच पडत नाही. कोण किती धावलं ?", " किती walk घेतला?" सगळं मित्राकडून कळतंच.
चहा संपवून ती स्वयंपाकघरात आली. " आज काहीतरी वेगळा पदार्थ करू या का?" विचार करता क्षणी मित्र हजर. त्यातल्या त्यात कमी वेळात उरकणारा पदार्थ तिने केला नाश्त्याला. कुकरच्या शिट्ट्या होईपर्यंत परत मित्राशी गप्पा. आता नाश्त्याचे फोटोस यायला सुरुवात झाली. आधी ती आईला सकाळी फोन करून भंडावून सोडायची..काहीतरी नवीन रेसिपि दे म्हणून. हल्ली आईच अधून मधून फोन करते "काय ग आज काय केलंस " आज्ञाधारक मित्रातर्फे ही निरोप पाठवून देते.. दृक-श्राव्य माध्यम आहेच की.
आता तिचं लक्ष गेलं यादीकडे. आता जरा प्रगल्भ मित्राची मदत लागणार होती. आधी ऑफिस च्या इमेल्स .. अगदी लक्ष वेधून घेणारी मेल नव्हती. म्हणून ही पुन्हा बाजूलाच असलेल्या मित्राशी पुन्हा गप्पा मारायला लागली. कोणी काय काय हितगुज केलं ते वाचलं, ऐकलं. ठरवल्याप्रमाणे बँकांचे व्यवहार केले. ऑफिस ची कामं केली. अधून मधून ती मित्राकडून जगाचा समाचार घेत होती. आणि एकदा का तिचा त्याबरोबर हितगुज सुरु झालं की पुन्हा सभोवतालचं भान राहत नसे. यादी कडे लक्ष गेलं की पुन्हा काम. असं करता करता दिवस संपला.
जेवण झाल्यावर झोपायच्या आधी तिला पुस्तकाची ४ पानं वाचल्याशिवाय झोप लागत नसे. पण हल्ली हा मित्र पुन्हा पुन्हा आभासी जगाकडे वळवतो आणि पुस्तक वाचायचं राहूनच जातं. यादीही अपूर्णच राहिलीये.
मिताली विचार करत होती.. अनेक चांगल्या सवयी मोडल्या आहेत . एकमेकांशी बोलण्यापेक्षा messaging जास्त convenient झालंय. एकाग्रता कमी झालीये हे मान्य करायलाच हवं. नजर काहीतरी शोधत असते सतत. पण काय ते कळत नाही. अनेक फायदे आहेत हा मित्र जवळ असण्याचे.. परंतु काही करण्याची धडपड, असोशी कमी झालीये. comfort झोन मध्ये गेलोय आपण. एखाद्या खेळण्याप्रमाणे हा मित्र साथ देत असतो. लोकांशी संपर्क वाढलाय पण काहीतरी हरवत चाललंय... या हरवण्यात नवीन सापडत जाईल कदाचित.. आणखी आशादायक..
पण सध्या तरी "कैसे करूं ध्यान .. कैसे पाहू तुज.. वर्म दावी मज याचकांसी ।... अशी अवस्था आहे.