व्यासांनी सगळी पात्रं लिहिताना त्याच्या पूर्व जन्मीच्या काही उपकथा जोडल्या आहेत. प्रत्येकाचं वागणं हे त्याच्या पूर्व संचिताची प्रतिक्रिया आहे असं नाट्य उभं केलं. एकलव्याची गुरुभक्ती आणि त्याची त्याने मोजलेली किंमत या गोष्टी ठळकपणे मांडल्या. पण या पात्राचा संदर्भ पुढे कुठेच नाही.
प्रत्यक्ष गुरूंकडून विद्या त्याने मिळवली नाही. त्या काळाच्या पद्धतीप्रमाणे गुरूंचा सहवास लाभला नाही.गुरूंना देण्यासाठी
त्याच्याकडे द्रव्य पण नव्हतं. पण कुरु वंशीय मुलांचं शिक्षण बघून त्याची अंतरीची उर्मी त्याला स्वस्थ बसू देईना. म्हणून त्याने गुरु द्रोणाचार्यांचा पुतळा बनवून विद्या ग्रहण केली. धनुर्विद्येत विशेष प्राविण्य मिळवलं.
इकडे अतिशय गरिबीत दिवस काढलेल्या द्रोणाचार्यांना राजकुमारांना शिक्षण देण्याची संधी मिळाली आणि त्यांचे दिवस पालटले. अर्जुनाची धनुर्विद्येतली प्रचंड गती बघता त्याला पृथ्वीतलावरील सर्वश्रेष्ठ धनुर्धर बनविण्याचा स्वतःशीच निर्धार केला. अंतरी ऐतिहासिक युद्धाची दूरदृष्टी पण होती.
तालीम उत्तम चालू असताना हा व्याध त्यांच्या नजरेला पडला. त्याचं कसब बघता त्यात त्यांना त्यांच्याच तालमीचं प्रतिबिंब दिसलं. आणि ” तुझे गुरु कोण?” हा प्रश्न विचारला असता त्याने द्रोणाचार्यांची प्रतिमा दाखवली. द्विधा मनस्थितीत अडकलेल्या द्रोणाचार्यांचा स्वतःचा निर्धार उजवा ठरला आणि अर्जुनाचं पारडं जाड झालं.
धनुष्याची प्रत्यंचा ओढणारा अंगठाच द्रोणांनी एकलव्याला मागितला. व्यथित झालेल्या एकलव्यापुढे काही पर्यायच नव्हता. “विद्या चोरून मिळवायची नसते” असा युक्तिवाद द्रोणांनी केला.
त्याने ती गुरुदक्षिणा दिली पण असंख्य प्रश्न उभे करूनच.
विद्याग्रहणाचा कुठलाच पर्याय नसताना एकलव्याने निवडलेला मार्ग चुकीचा कसा? या क्रियेमागे द्रोणांची महत्वाकांक्षा होती का?
द्रोणाचार्यांची अर्जुनाच्या बाबतीतली जिद्द किती तीव्र होती हे व्यासांना या प्रसंगातून दाखवायचं होतं का?
एक नाट्यमय प्रसंग यापलीकडे या कथेकडे बघायचे का?
या एकलव्याचं पुढे काय झालं हे व्यासांनी का सांगितलं नाही?
मला हा प्रश्न पडतो की महाभारत सार्वकालिक आहे असे म्हणतात तर या “तसे बघता”अन्यायाचे स्पष्टीकरण काय? आपल्या समाजात देखील असंख्य असतील. पण असे अगतिक द्रोण त्यांना ना लाभोत.