मरीन लाईन्स वरून घरी जाताना सोनाला AC नको वाटायचा. छान खिडकी उघडून वारं गाडीत शिरू द्यायला आवडायचं तिला. त्यात पाऊस असला तर थोडे तुषार पण अंगावर घ्यायला आवडायचं. त्या करड्या आभाळात बघताना चित्रातला अवकाश आपण का शोधत असतो ते तिला कळलं.
" जिंदगी लंबी नही बडी होनी चाहिये " यावर सोनाचा पूर्ण विश्वास होता. ती सतत स्वतःला busy ठेवत असे. काही जवाबदारी म्हणून तर काही " हटके " असावं म्हणून. स्वतःमध्येच रमायची पण ती. फार माणसं असली की तिची ती उरत नसे. मग थोड्यावेळाने तिला अस्वस्थ वाटायचं. मुलांमध्ये स्वतःला विसरून जायची. पैंटिंग्स काढताना एकदा का रंगांची आणि रेषांची लय जुळली कि तिला सभोवतालचं भान राहत नसे. चित्र रंगांमध्ये बुडालं असलं तरी त्यात थोडा अवकाश ठेवायची ती. तिला ते करड आभाळ दिसायचं त्यात. चित्र काढताना तिला हरिजींची बासरी ऐकायला आवडायचं.
पण आजचा दिवस वेगळा होता. मनासारखं काही उमटत नव्हतं. आणि का ते उमगत नव्हतं. तसं डोक्यात रिकामपण होतं त्यामुळे ब्रश आणि पेन्सिल दोन्हीची लय पण जुळत नव्हती. कसं असतं ना..डोक्यात खूप गुंता असला तरी हवं तसं उतरत नाही आणि रिकामपण असलं तरीही. कधी कधी तुम्ही सगळ्यांमध्ये असलात तरी एक रिकामपण असतं..मनात आणि डोक्यात.. जे हवं पण असतं आणि नकोही. आपलं अवकाश शोधत असताना भरून पण येतं. मग मनाची आणि विचारांची फारकत होते. आणि हवं ते उतरत नाही.
" कलेसाठी कला " असावी असं म्हणतात. पण ते तसं नसतं. आपला अख्ख आयुष्य जर कलेने व्यापलं नाही तर काय उपयोग? जगण्यातल्या सकारात्मक गोष्टी आणि सगळ्यांसाठी उदार दृष्टिकोन हवा, जर कलेतील उच्चांक गाठायचा असेल तर. आपण एरवी या गोष्टी कटाक्षाने पाळतो. कुणाला विनाकारण दुखवत नाही. कुणाच्याही personal space मध्ये डोकावत नाही. मग आज काय बिनसलंय?दिवसभराच्या गोष्टीचा आढावा घेताना ती सकाळपासूनच्या सगळ्या घटनांचा संदर्भ लावत होती. सकाळ नेहमीसारखीच प्रसन्न होती. वीणाताईंचा "अहिर भैरव " ऐकत सकाळची कामं उरकली. उमा नेहमीपेक्षा उशिरा आली. त्यामुळे तिला ऑफिसला निघायला उशीर झाला. ..हां इथेच तर मेख आहे. उमाला कारण न विचारता आपण बोल लावले. " मी तुझ्यासाठी की तू माझ्यासाठी" असं काहीसं बोललो आपण. आणि झर्रकन निघालो. ट्रॅफिक वाढला होता. ऑफिस मध्ये पोहोचेपर्यंत ठेकेदारांना, सरकारला भरपूर शिव्या देऊन झाल्या. ऑफिस मध्ये client नेमका लवकर पोहोचला त्यामुळे boss ने नजर मारली. ठरवल्याप्रमाणे deal काही पॉईण्ट्स नी खाली आणावी लागली.
पण त्यानंतर मात्र दिवस उत्तम गेला. येताना पाऊस पण होता. करड आभाळ पण होतं . एक चित्र मनात आकारू लागलं . कधी एकदा कॅनवास आणि आपली गाठ पडते असं झालं. कडक चहाचा कप घेऊन ती कॅनवास समोर उभी राहिली आणि एकच गुंता झाला. सुरुवातच कुठून करायची सुचेना. चहाही संपला आणि ती हताश एका जागी बसली.
"माणूस" म्हणून आपण उमाच्या बाबतीत चुकलोय हे तिच्या लक्षात आलं.. तिने उमाला फोन लावला. उमा म्हणाली" ताई, माझ्या मुलाला रात्रभर ताप होता. सकाळी डोळा लागला म्हणून कामावर यायला उशीर झाला." त्याची काळजी घे..उद्याही येऊ नकोस. " असं सांगत असताना तिला चित्रातले अवकाश दिसू लागलं.
सुरुवात सापडली आणि रंग आणि रेषांची लय जुळली. चित्र मनासारखं पूर्ण झालं.... अवकाशासकट.... आणि तंद्री भंगली तेव्हा बाहेर अंधार पडला होता पण मनातून ती प्रकाशली होती.