२६ जुलै चा अस्ताव्यस्त पाऊस. रीमा ऑफिसमधून बाहेर बघत होती. घरी जाणं खूप कठीण होतं . तिचं ऑफिस चर्चगेटला आणि घर गोरेगावला . रोज ती ७ वाजेपर्यंत घर गाठत असे. नंतर मंगलाताई सोनीला तिच्याकडे सोपवून त्यांच्या घरी जात. त्याच अंदाजानी ती ५ ला निघाली . पाऊस होता. स्टेशनपर्यंत पोहोचली. ट्रेन्स चे गोंधळ सुरु होते. तरीदेखील गाडीत चढली. तेवढ्यात हळू हळू गाडी पुढे जात होती. तिचा फोनही discharge होत होता. तिने प्रकाशला फोन केला. तोही निघाला होता त्याच्या ऑफिस मधून. ट्रेन मधून पावसाचा अक्राळ विक्राळ रूप दिसत होतं . तेवढ्यात माहीम आणि बांद्र्याच्या मध्ये ट्रेन बंद पडली आणि हिला एकदम हताश वाटलं.
आता काय करायचं ? खाली उतरलं तर गुडघाभर पाणी आणि ट्रेन सुरूच नाही झाली तर तिथेच थांबावं लागेल. मदत मागायची तर कुठे आणि कशी? सगळेच एकाच बोटीतले. १ तास तसाच गेला. हताश वाटत होतं . आणि आता काहीच शक्य नाही म्हणता सोनीचा चेहरा दिसायला लागला तिला आणि रडवेली झाली . एक दोघी बायका ट्रॅकवर उतरल्या. हिम्मत करून तीही उतरली आणि गुडघाभर पाण्यात चालायला लागली. छत्रीचा काही एक उपयोय नव्हता. पण धरली होती तिने डोक्यावर. आपल्याबरोबर अनेक आहेत असं जाणवून तिला जरा बळ आलं .
ती किती आणि कशी चालत होती तिला कळतच नव्हतं .मॅन होल आलं तर काय होईल? आलेला विचार झटकून टाकून ती आणखी झपाझप चालू लागली. सोनी नजरेसमोर येत राहिली आणि तिला आणखी अगतिक वाटायला लागलं.
तब्बल ३ तास चालून तिने घर गाठलं. दारात मंगलाताई दिसल्या. थोडं हायसं वाटलं आणि तेवढ्यात तिला सोनी दिसली. तिने तशाच ओल्या कपड्याने तिला कडेवर घेतलं आणि उरलेलं अवसान गळालं. तिने रडून घेतलं खूप आणि मग कपडे बदलायला गेली.
ताज हॉटेल वर दहशतवाद्यांनी हल्ला केला. रेल्वे स्टेशन्स, मॉल्स आणि एअरपोर्ट वर high alert होता मुंबईत. मोकाट सुटलेले दहशतवादी कुठे असतील कुणाला कळत नव्हतं . त्याच वेळी ATS च्या ३ ऑफिसर्स ना त्यांनी मारल्याची news आली. ८ वर्षाचा आकाश कराटेच्या tournaments साठी हैद्राबादला गेला होता. त्याच्या सरांबरोबर. त्याला घ्यायला अनघा हैद्राबादला जाणार होती. मुंबई शहर एवढ्या गंभीर परिस्थितीत असताना सगळे अनघाला न जाण्याबद्दल सांगत होते. पण तिची अस्वस्थता कमी होईना. आकाशची खूप आठवण येत होती. शेवटी ती निघाली. एअरपोर्टवर गेली. सतत अलर्ट चे संदेश येत होते. पण अनघाला सुचत नव्हतं . देवाचं नाव घेऊन ती flight मध्ये बसली. डोळे मिटून पडून राहिली ती. हैदराबाद एअरपोर्टवरून आकाशच्या tournaments च्या ठिकाणी गेली ती. तोपर्यंत आकाशाची match होऊन त्याच्या गळ्यात गोल्ड मेडल घालत असताना ती नेमकी पोहोचली तिथे. टेन्शन मुळे आलेली अगतिकता त्यामुळे तिचे डोळे भरून आले. सुखरूप पोहोचल्याचा तिने नवऱ्याला फोन केला.
हिरकणी केवळ शिवकालीनच नव्हती. झाशीच्या राणीने एकदाच जन्म नाही घेतला.
मातृत्वाची जवाबदारी आणि ओढ प्रत्येक काळात सारखीच . गड उतरून येणं काय, घोडा घेऊन शत्रूवर तुटून पडणं काय, स्वतःच्या जीवाची पर्वा न करणाऱ्या रीमा आणि अनघा काय.. सगळी ही हिरकणी आणि झाशीच्या राणीचीच रूपं ..