भरतमुनींच्या नाट्य शास्त्रात सांगितलेल्या अष्टनायिका सौंदर्यदृष्टी साठी योग्यच आहेत. परंतु स्त्रीची केवळ एवढीच रूपं नाहीयेत. कणखर, स्वयंप्रेरित, स्वाभिमानी, कर्तृत्ववान आणि स्वतःचं अस्तित्व सिद्ध करण्याची क्षमता असलेल्या अनेक स्त्रियांचा आदर्श समाजासमोर असला तर त्यातून प्रेरणा घेऊन अनेक रत्न सशक्त समाज निर्माण करू शकतात.
पिएर क्युरींच्या अपघाती निधनानंतर अधिक कणखरपणे जगाचा सामना करणारी, मुलींच्या संगोपनाबरोबरच अनेक विद्यार्थ्यांच्या संशोधनासाठी मार्गदर्शन करणारी, महायुद्धाच्या वेळी अनेक जखमी जवानांसाठी xray मशीन्स ठिकठिकाणी घेऊन "राष्ट्र प्रथम" या भावनेनी फिरणारी, पट्टीची पोहणारी, मैलोन्मैल सायकलनी फिरणारी, रेडियम इन्स्टिटयूट साठी सतत झटणारी, दिवसाचे १४-१६ तास काम करणारी, रोज नवीन आव्हानं पेलणारी तरीही निराश न होणारी, भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्र या दोहोंमध्ये तेवढ्याच वकुबाने काम करणारी ही स्त्री संशोधिका म्हणजे मेरी क्युरी . अनेक research पेपर्सची लेखिका खरोखर झपाटून टाकते. खूप ऊर्जा देऊन जाते.
वनस्पतिशास्त्रातील योगदानासाठी १९७७ साली "पद्मश्री " मिळवणारी पहिली भारतीय महिला म्हणजे जानकी अम्मल. बोटॅनिकल सर्वे ऑफ इंडिया ची पहिली डायरेक्टर जनरल. विसाव्या शतकात थोडा हटके विषय घेऊन त्यात स्वतःचा ठसा उमटवणारी जानकी. cytogenetics सारख्या कठीण विषयात काम करणारी Presidency College ची विद्यार्थिनी.
organic chemistry आणि phytochemistry या विषयांत उल्लेखनीय कामगिरी करणारी संशोधिका अमिता चॅटर्जी. सदाफुलीच्या अर्कातून कर्करोग, अपस्मार तसेच मलेरिया वर संशोधन करणारी पहिली भारतीय महिला.
अतिशय हुशार, मेधावी आणि मेहनती lady scientist- कमलाबाई भागवत -सोहोनी. मुद्दाम lady का लिहावा लागलं यालाही कारण आहे. काहीतरी वेगळं करू पाहणाऱ्या स्त्रियांना नेहमीच तत्कालीन समाजाशी संघर्ष करावा लागलाय. "जीव रसायन शास्त्र" यासारखा सध्या प्रचलित परंतु त्याकाळी अप्रचलित विषयात त्यांना विसाव्या शतकात संशोधन करायचं होतं. तेव्हा सर्व पात्रता अंगी असूनही त्यांना बंगरुळूच्या च्या IISc संस्थेत चक्क Dr. C. V. Raman यांनी प्रवेश नाकारला . कारण --- कुठल्याही स्त्रीला तोपर्यंत तिथे प्रवेश दिला गेला नव्हता एवढंच. स्त्रीचं हे क्षेत्र नाही असं परस्पर सगळ्यांनी ठरवून टाकलं होतं. संघर्ष करून प्रचंड मेहनत आणि अपार बुद्धिमत्तेच्या जोरावर त्यांनी स्वतःचं संशोधन केलं.
सुरुवातीच्या काळात स्त्रियांसाठी निषिद्ध मानलं गेलेलं संगीत हळू हळू घराघरातील स्त्रियांच्या ओठी आलं. आणि केवळ घरापुरतं सीमित न राहता स्टेजवर स्त्रियांकडून शालीनतेनी मांडलं गेलं. आणि बऱ्याच जणींकडून करिअर म्हणूनही घडवलं गेलं. शिक्षणासाठी जसा स्त्रियांना संघर्ष करावा लागला त्याचप्रमाणे गाणं करण्यासाठी पण प्रस्थापित व्यवस्थेविरुद्ध संघर्ष करावा लागला.
सुरेशबाबू माने यांच्याकडे किराणा घराण्याची रीतसर तालीम घेऊन हिराबाई बडोदेकर यांनी शालीनतेनी दोन्ही खांद्यावर पदर घेऊन आणि हातात तंबोरा घेऊन जाहीर सभांमधून स्वतःचं अस्तित्व प्रस्थापित केलं. आणि स्त्रियांच्या अनेक पिढ्यांचा मार्ग सुकर केला. तालीम ही पुरुष गायकांमुळे घेतल्यामुळे त्यातले स्वरलगाव पुरुष गायकांसारखे होत असत. पण हिराबाईंनी हा स्वरलगाव feminine होईल यासाठी विशेष लक्ष दिले. त्यामुळे " कवन देस गये" हा मुलतानीतील ख्याल किंवा यमन मधली "सुगर बना " आणि " मोरी गगर ना भरन देत" हे ऐकताना एका स्त्रीचंच गाणं ऐकतो आहोत असं वाटतं. संपूर्ण आकारयुक्त बढत असली, थोडी जलद लय असली तरी त्यातल्या हरकती स्त्रीसुलभ सौंदर्याने परिपूर्ण आहेत.
"कौसल्या सुप्रजा रामा.. " हे स्तोत्र ऐकून अजूनही सकाळ प्रसन्न होते. "व्यंकटेश स्तोत्र", "विष्णू सहस्त्रनाम", "हरी तुम हरो " अशी स्तोत्र गाऊन घरा - घरात पोहोचलेल्या एम एस सुब्बलक्ष्मी. साध्या सोज्ज्वळ आणि गाण्याला पूजा मानणाऱ्या सुब्बालक्ष्मी या " भारत रत्न " मिळवलेल्या पहिल्या गायिका होत्या. " रमन मॅगसेसे " पुरस्काराने सन्मानित होत्या. "युनाइटेड नेशन्स जनरल असेम्बली " मध्ये गाणाऱ्या पहिल्या भारतीय महिला कलाकार होत्या.
स्वातंत्रपूर्व काळात जन्मलेल्या सगळ्या स्त्रियांनी अतिशय कष्टाने संगीत विद्या मिळविली. अपुऱ्या दळण - वळणाच्या साधनांमुळे गावोगावी खडतर प्रवास केले. पुरुष कलाकारांपेक्षा कमी बिदागीत आपली कला सादर केली. त्या ब्रिटिशकालीन भारतात अनेक सामाजिक बंधनांना सामोऱ्या गेल्या. परंतु अत्यंत जिद्दीने, संगीताची पूजा बांधून मंचावर आपली कला सादर केली. त्याला एक प्रतिष्ठा मिळवून दिली. त्यातलं पावित्र्य लोकांसमोर आणलं. अनेक स्त्री पिढ्यांचा मार्ग सुकर केला. वडील-भाऊ-गुरु यांचा भक्कम पाठिंबा तर होताच परंतु त्यांची स्वतःची गाण्याप्रती निष्ठा वादातीत होती.
विज्ञान आणि कला या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या काही महिलांची इथे केवळ ओळख दिलीये. अशा अनेक स्त्री संशोधिका आणि कलाकार आपल्या देशात आहेत. पोषक विचार आणि आचार अमलात आणलं तर प्रत्येक दिवसच महिला दिन.
1 Comment
खूप माहितीपूर्ण आणि विषयाची छान मांडणी असलेला लेख