अनेक पातळ्यांवर challenges असल्याने तो सैर भैर झाला होता . प्रत्येक ठिकाणी त्याच्या सहन शक्तीचा कस लागत होता. तो वर वर शांत राहण्याचा प्रयत्न करत होता . पण त्याला जरा खरोखर शांतता हवी होती. तो गायला बसला.. षड्ज लावला आणि ती अशांतता कुठल्या कुठे पळाली. त्याला एकदम आजूबाजूचा परिसर, परिस्थिती याचा विसर पडला. केवढी ताकद होती त्या स्वरात. तो किती वेळ मन लावून गात होता त्याचं त्याला कळलंच नाही. तंबोरा ठेवला तेव्हा एका अवर्णनीय आनंदानी तो भारावला. हा आनंद आयुष्यभर टिकावा, त्यातलं सातत्य टिकावं म्हणून तो सतत प्रयत्नशील होता.
दर्जा आणि रंजकता या द्वंद्वात अडकलेला तो. सापडतच नव्हता मार्ग. रियाझ करतानाही मी "सांगू कशी कुणाला कळ आतल्या जीवाची" अशी अवस्था. शिक्षण थांबतच नव्हतं . काहीतरी शोधायचं आहे पण "नेमकं काय" हेच कधी कधी कळत नाही. इथली स्पर्धा , लोकांना आवडेल कि नाही ही साशंकता. कलाकाराने अस्वस्थ असावं पण हि अस्वस्थता अक्खा आयुष्यच व्यापून टाकते.
सगळी पथ्य पळून सुद्धा यशाची वाट नेमकी कुठली याबाबत संभ्रम. जगाची व्यवहार्य बाजू आणि कलेची निष्ठेची बाजू सांभाळताना होणारी तगमग. नुकताच "The Disciple " पहिला आणि त्या निमित्तानी जाणवलेल्या या काही गोष्टी.
अभिजात संगीत करताना बंधनं अधिक. शास्त्र आणि कला यांचा समन्वय साधण्यासाठी लागणारी मेहनत आयुष्यभर पुरणारी. या प्रांतात यश मिळवण्यासाठी लोकांचा कौल घेणं आवश्यक. पण इथे सगळी गडबड होत जाते. रियाझ, राग , बंदिशी यात आपण इतकं गुंतत जातो. स्वतःशी संवाद साधत जातो आणि मग हळू हळू लोकांशी, समाजाशी असणारा संवाद तुटत जातो.
बाकी सगळी professions तसाच हेही एक profession. असा याकडे कलाकार आणि लोक दोघंही बघत नाहीत. कायम "मनरंजन" आणि "जनरंजन" या कात्रीत अडकलेला कलाकार थोडा एकटा पडत जातो. जसं इतर professions मध्ये सुद्धा प्रगती करायची असेल तर नित्य नव्याने वेगवेगळी कौशल्य अंगीकारावी लागतात तसंच या क्षेत्रात सुद्धा स्वरावरच्या शुद्धतेबरोबरच, शास्त्राच्या काट्यावर उभं राहून सुद्धा स्वतःची अशी ओळख निर्माण करावी लागते. अनेक skills develop करावी लागतात.
जसं आपण कुठल्याही ऑफिस मध्ये काम करत असतो. एखादं presentation असतं . त्याची तयारी आपण महिनोन्महिने करत असतो. ते प्रेसेंटेशन काही मिनिटांचाच असतं. एखादं lecture तयार करण्यासाठी आपला अनेक तासांचा अभ्यास असतो. तसंच कुठे गायचं असेल तर अनेक काळाचा रियाझ असावा लागतो. गाण्यासाठी मन , बुद्धी गळा याचा कस लागतो प्रत्येक वेळी. गुरूंचे पूर्ण आशीर्वाद लागतात. गायकी आणि नायकी चा झगडा असतो. परंतु , एवढ्या प्रॅक्टिकल दृष्टिकोनातून याकडे बघत नाहीत.
या क्षेत्राचं attraction अजिबात कमी झाला नाहीये. परंतु व्यवहार्यता सांभाळण्यासाठी लागणारी सुदृढ आणि सशक्त व्यवस्था अजूनही तयार झाली नाही. मानसिकता ही नाही. उदरनिर्वाहाचं साधन म्हणून या क्षेत्राला निवडायचं कि नाही याबाबतीत संभ्रम आजही तसाच आहे. जास्त सजग होण्याची गरज आहे. हे सांभाळायचं असेल तर सगळ्यांनी मिळून सांभाळायला पाहिजे. योग्य रीतीने सांभाळायला पाहिजे आणि अवास्तव अशा अपेक्षा आणि चालीरीती आपणहून कमी केल्या पाहिजे. evolve झाल्याशिवाय इथे तग धरणं कठीण.
तरीही मी म्हणेन " जो करेगा, जितना करेगा .. वोही समझ पायेगा". सकारात्मकता टिकवणं सगळ्यात मोठं आव्हान आहे इथे.