इवल्याशा पावलांनी आलेली ती.. लहानशी जिवणी , इवलेसे हात आणि डोळे मात्र भावपूर्ण ..मोठे आणि पाणीदार... सगळं जग बघण्यासाठी भिरभिरती नजर. झोप अशी नाहीच.. सगळ्या जगाशी ओळख करून घेण्यासाठी धडपड... पालथं पडायची घाई.. रांगण्याची घाई आणि आणि चालण्याची पण... एक जात्याच चंट पणा असतो तिच्यात .. आनंद घेताना आपल्याभोवती आनंद पसरवण्याची एक कला असते तिच्यात . लवकर शहाणी होते . mature होते . स्वत्वाची जाणीव व्हायला होते. आणि स्वतःची एक ओळख तयार करण्यासाठी एक अंतर्भूत असोशी. "हे असं का?", " ते तसं का?" असे असंख्य प्रश्न . योग्य उत्तरं नाही मिळाली कि चीड चीड.
अभ्यासाबरोबरच अनेक गोष्टी शिकण्याची तयारी. मेहनतीची तयारी. आपलं व्यक्तित्व सर्वांगांनी खुलवण्यासाठी प्रयत्न. काही crazy गोष्टींचा पाठपुरावा. काही " मला असंच आवडतं " चा धोशा . क्षणात हसणार तर क्षणात हिरमुसली होणार. जितकी वर वर दिसते तितकीच सखोल काही तरी स्वतःशी ठरवणार.
एका वेळी अनेक गोष्टी लीलया पेलणारी ती. खरोखरच अष्टांगांनी सगळ्या गोष्टी सांभाळणारी ती. मुळातच हे शहाणपण असतं तिला. याच्या पलीकडे काम झालं तरच बॅलन्स जातो.
बिघडलेल्या, बिनसलेल्या घटना पुन्हा रुळावर आणण्याची कला साधली असते तिला.
एक प्रेमळ मुलगी, बहीण. विश्वासू मैत्रीण. मेहनती working woman. कधी कडक तर कधी हळवी . घराला बांधून ठेवणारी गृहिणी. स्वतःबद्दल जागरूक असणारी अशी हि स्त्री, मुलगी, आई, आणि स्वयंसिध्दा .
माझ्या सभोवताली असणाऱ्या अशा सगळ्या "girl child " ची हि रूपं . जीवन रसानी परिपूर्ण.. मोहक, आनंदी, करारी आणि प्रेमळ ..
1 Comment
छान