काल एक WA वर एक forward आला एका मैत्रिणीकडून. त्यात एक रेकॉर्डेड msg होता. " प्रत्येकाच्या आयुष्यात कृष्ण हवाच"..असा.. फारच छान, स्पष्ट आणि अगदी मनोमन पटणारा होता तो msg.
लहानपणी एक सवंगडी हवा.. अनेक बरोबरीची मुलं -मुली असताना सुद्धा.. सवंगडी फार थोडके असतात. ते मित्र-मैत्रिणी कोणीही असू शकतात. त्यांच्याशी गट्टी जमते.. वेगवेगळ्या स्वभावाचे असूनसुद्धा. मी आणि माझी मैत्रीण शाळेत असताना रोज भेटायचो. फारशा गप्पा पण नाही मारायचो. पण एकमेकांबरोबर असायचो. आता आठवलं की गम्मत वाटते. माझी बहीण आणि तिची मैत्रीण तासंतास एकमेकांसमोर बसून असायच्या. काय गप्पा व्हायच्या त्यांच्यामध्ये हे आम्हाला कळायचं पण नाही.
जसे आपण मोठे होत जातो तसे आपल्या आवडी-निवडी ज्यांच्याशी जुळतात त्यांच्याशी मैत्री पण जुळत जाते. पण त्यातल्याही एखाद्याशीच " मैत्र" जुळतं. तो तुमचा कृष्ण होतो. सखा किंवा सखी होते. हे सख्य जपणं दोन्हीकडून व्हायला हवं. मनुष्य प्राणी आत जेवढा खोल असतो ती खोली जाणवणारं आणि जाणणार कुणीतरी त्याला हवं असतं. म्हणून बरेचदा असंही होतं की वेगवेगळ्या विषयांवर बोलण्यासाठी एकापेक्षा जास्त कृष्णाची गरज भासते.
तारुण्यात पदार्पण केल्यावर राधेला कृष्ण आणि कृष्णाला राधा ही हवीच. दुर्गा भागवतांनी एका ठिकाणी म्हटलंय की कृष्णाची मुरली फक्त राधेसाठीच होती. मधुरा भक्तीचं ते एक सुंदर उदाहरण होतं. गोकुळ सुटल्यावर कृष्णाने कोणासाठी बासरी वाजवलेली ऐकिवात नाही. जीवनातल्या चैतन्याला कडकडून भेटणं म्हणजे कृष्णाची बासरी. निरपेक्ष प्रेम म्हणजे कृष्णाची बासरी. शृंगार, भक्ती, विरह आणि बैराग यांचं मिश्रण म्हणजे कृष्णाची बासरी. अशा बासरीसकट येणाऱ्या खोडकर कृष्णाची वाट तारुण्य बघत असतं.
आयुष्यातले निर्णय घ्यायला मदत करणारा कृष्ण आयुष्याच्या प्रत्येक वळणावर भेटावा लागतो. ते निर्णय व्यवसायातले असोत, वैयक्तिक असोत. नीर-क्षीर वृत्तीने विचार करायला लावणारा कृष्ण हवा. प्रत्येक वेळी धर्मयुध्दच नाही तर आपल्यातल्या दुर्गुणांशी युद्ध करायला लावणारा कृष्ण, चांगल्या गोष्टीसाठी प्रोत्साहित करणारा कृष्ण, अगदी हतबल वाटत असताना द्रौपदीचा सखा झालेला कृष्ण. केवळ सोबत करणारा कृष्ण, आततायी निर्णय घेण्यापासून परावृत्त करणारा कृष्ण, निराश झालेल्या अर्जुनाला गीता सांगून त्याचे कर्तव्य करण्यासाठी प्रवृत्त करणारा कृष्ण.
वृद्धपकाळात कधी साधं संभाषण करण्यासाठी कृष्ण हवा. मनातला सल बोलून दाखवण्यासाठी कृष्ण हवा. शारीरिक असलेल्या किंवा नसलेल्या व्याधी सांगण्यासाठी कृष्ण हवा. अबोलपणे केवळ साहचर्य करण्यासाठी कृष्ण हवा. त्याच्यावर सर्व भार टाकून बंधन मुक्त होण्यासाठी कृष्ण हवा. सगळं जीवन ज्याच्या चरणी अर्पण करण्यासाठी कृष्ण हवा. लिहिलेलं वाचायला , गायलेलं ऐकायला कृष्ण हवा.
कृष्ण ही एक संज्ञा आहे. पुरुष किंवा स्त्री कोणीही असू शकते. कृष्ण असतोच. असतातच. आपल्या आस -पास. तो आपल्या आतसुद्धा असतो. त्याला जागवावं लागतं. जगवावं लागतं. त्याला मनापासून हाक द्यावी लागते. अगदी अंतरात्म्यातून..
2 Comments
फारच छान कल्पना आहे.
Chhan manogat . Jyacha tyacha krushna olkhata yayla hawa .