शाश्वतचा जन्म झाला आणि घरी सगळ्यांनी सुटकेचा श्वास टाकला. सगळे आंनदी झाले. सीमा अतिशय दमली होती कळा देऊन. अक्खी रात्र लागली सुटका व्हायला. नर्सेसची धावपळ, घरच्यांची लगबग ती अर्धवट ग्लानीत अनुभवत होती.
९ महिन्याचा जीव आईशी जोडलेली नाळ तोडून जगात येतो. एक स्वतंत्र व्यक्ती म्हणून त्याला स्वतःचं आयुष्य जगायचं असतं त्याला. आई वडील फक्त तो या जगात यायला कारणीभूत ठरतात. हे सगळं तिने तिच्या मैत्रिणीला सांगितलं असतं १ महिन्यापूर्वीच. सीमाने कोवळ्या जीवाच्या डोक्यावरून हात फिरवला. लहानग्या मुठीमध्ये स्वतःचं बोट दिलं आणि प्रसन्न हसली. झालेले सगळे कष्ट विसरली. त्यानंतरच्या अनेक रात्री तिने जागून काढल्या. बाळाचे कपडे, दूध, औषधपाणी यात स्वतःला झोकून दिलं . बाळ वाढत होतं . मोठं होत होतं पण सीमा दिवसेंदिवस त्यात गुंतत होती. त्याच्या वेळांप्रमाणे स्वतःचं आयुष्य आखत होती.. बाळंतपणानंतर ऑफिस जॉईन करणं फारच जड गेलं तिला.
दीड वर्षांचा असताना शाश्वत पलंगावरून पडला. डोक्याला लागलं . तशाच अवस्थेत ती धावत Dr. कडे धावली ट्रॅफिक ची पर्वा न करता. जीवाच्या आकांताने शाश्वत रडत असताना सीमाही आतून रडत होती. दवाखान्यात औषधांमुळे शाश्वत नीट झोपला. पण त्याच्या उशाशी बसलेली सीमा रात्रभर जागी होती. जराही तो हलला तरी लगेच उठून बघत होती.
सातवीत असताना गणिताचा अभ्यास घेताना तिच्या लक्षात आलं कि शाश्वतचं गणित कच्च राहिलंय. रोज ऑफिसमधून येऊन एक तास त्याचा फक्त गणिताचा अभ्यास घेतला. परीक्षेमध्ये गणितात पूर्ण मार्क मिळाले. तो तर नाचतच आला पण महिनाभर आपण याला फार रागावलो हे आठवून तिच्या डोळ्यात पाणी आलं ..
दहावीची परीक्षा असताना cycle वरून पडून शाश्वतचा डावा हात नेमका परीक्षेच्या वेळी fracture झाला. पेपर नीट लिहिता येत होता पण डावा हात जराही कुठे टेकला की सारखी कळ येत होती. ऑफिसच्या कामांच्या दृष्टींनी मार्च महिना अतिशय महत्वाचा असूनसुद्धा without pay रजा घेऊन ती शाश्वतबरोबर राहिली. त्याला पेपर लिहिताना कमीत कमी त्रास होईल याची काळजी घेत राहिली. पेपर होईपर्यंत बाहेर उभी राहिली उन्हाची पर्वा न करता. . पेपर सोडवून आल्यावर त्याचा चेहरा पाहूनच पेपरचं भविष्य तिला कळत होतं . पुढच्या
पेपर्स साठी त्याला cheer up करत राहिली. .
२ वर्ष सलग मेहनत करून बारावीची परीक्षा शाश्वत चांगल्या मार्काने पास झाला. या दोन वर्षात जितका वेळ तो अभ्यास करत असे तेव्हा ती त्याच्या आस पास काही ना काही कारण काढून राहत असे. त्याच्याबरोबर जागत असे. तो जेव्हा सांगेल त्याप्रमाणे त्याला उठवत असे. त्याच्या खाण्यापिण्याकडे जातीने लक्ष घालत असे. ऑफिस चं बरंचसं काम घरी करत असे. .. पुढच्या शिक्षणासाठी शाश्वतला लांब जावं लागणार होतं . त्याने खूप आधीच ठरवलं होता त्यामुळे त्याच्या आवडीच्या ठिकाणी admission झाल्यावर तो खूपच खुश होता. एक महिनाभर त्याच्या जाण्याची सीमा तयारी करत होती. बारीक सारीक वस्तूंची खरेदी करत होती. त्याला काळजीवजा सूचना करत होती. जेव्हा त्याला कॉलेजला सोडून आली तेव्हा स्वतःतील काहीतरी वेगळं करतोय असा तिला भास झाला. त्यादिवशी तिला त्याचं सगळं लहाणपण नजरेसमोरून चित्रपटासारखं तरळून गेलं . ती अस्वस्थ झाली. .
आता घरी तिला भरपूर वेळ मोकळा मिळत होता. पण ती occupied होती. शाश्वतच्या काळजीने, नवीन जागी तो रमेल का? चांगले मित्र मैत्रिणी मिळतील का? कॉलेज कसं असेल? अभ्यासापेक्षा इतर distractions असतील का? अभ्यासक्रम जाड जाईल का? नीट खात-पीत असेल का? कुणीही तिकडे जाणार असेल तर त्यांच्याबरोबर घरचे डबे पाठवत असे. .
शिक्षण संपवून शाश्वत चांगल्या ठिकाणी नोकरीला लागला. रोज फोन करत असे.अनन्या त्याच्याबरोबर ऑफिस मध्ये होती. तिच्याबद्दल भरभरून बोलत असे. तिचं कौतुक करत असे. तो तिच्यात गुंतत चाललाय हे सीमाला जाणवत होतं . तिला आनंद होता पण थोडी अस्वस्थताही जाणवत होती.
आता ही कशाची अस्वस्थता? ती विचार करायला लागली. खरंच नाळ तुटली होती का? की ती फक्त एक मेडिकल टर्म होती.? प्रत्यक्षात तिची नाळ इतकी वर्ष जास्त घट्ट रुजत होती. तिच्या अस्तित्वाचाच भाग बनली होती. तिने स्वतःचं आयुष्य सहजपणे त्याच्याभोवती गुंफलं होतं.
आणि आता त्याची गाठ अनन्याशी पडली होती. ती आता जास्त घट्ट होणार हे तिला जाणवायला लागलं. आपण आता थोडं बाजूला होऊन जरा समांतर जायला हवं हे तिला कळलं. जे जे मोती काही कारणाने सांडले ते मोती जमवायला तिने सुरुवात केली. वाट बघत राहिली की ही नाळेची गम्मत अनन्याला कधी सांगता येईल याची. एक वर्तुळ पूर्ण व्हायला जशी एक नाळ असते तशीच वर्तुळातून वर्तुळ निर्माण व्हायला दुसरी नाळच लागते आणि हे जग चालत राहतं . आपण त्यातली एक कडी फक्त. अखंड अशी..