" पाणी संपलंय " हे सकाळी ब्रश करतानाच निर्मलाला कळलं . चहासाठी स्वयंपाकघरात गेल्यावर रात्री दूध न तापवल्याने फाटलंय हे लक्षात आलं. ते सोडून ती ओंकारची शाळेची तयारी करायला गेली तर त्याच्या युनिफॉर्मला इस्त्री नाहीये हे लक्षात आलं . ते काम आटोपून ती पुन्हा स्वयंपाकघरात गेली तर कांदा कापताना बोटही कापल्या गेलं . हळहळ करायला वेळ नसल्याने त्यावर हळद दाबून ती पुन्हा कामाला लागली. भाजी पोळीचा डबा तयार करून तिने ओंकारला तयार केलं . " आजही भाजी पोळीच का आई? " असा फुरंगटून शाळेत गेला.
सकाळी उठल्या उठल्या चहा मिळाला नाही म्हणून विराजही कटकट करत होता. " नाश्त्याला काय करू? " ह्या प्रश्नाला " काहीही कर" असं तुटक उत्तर दिलं त्याने. त्याचा आवरून झाल्यावर तिने दोघांच्या बशा भरल्या. टेबलवर बसून पहिला घास घेतला आणि तिच्या लक्षात आला की पोह्यात मीठ टाकायला विसरलोय आपण. विराज बाहेर येईपर्यंत तिने पटकन तव्यावर ऑम्लेट टाकलं. तिची धांदल लक्षातही न येता विराज घराबाहेर पडलाही.
ती जरा विसावली तेवढ्यात दारावरची बेल वाजली..दूधवाला ... तिने पटकन दूध घेऊन तापवलं. चहाचा कप हातात घेऊन ती जरा सोफ्यावर रेलली. जरा विचार करायला लागली.." फार गुंतलोय का आपण संसारात?" .." सगळ्या गोष्टी अगदी परफेक्टच असायला हव्या असा आपला अट्टाहास असतो का? पाणी आलं नाही यात आपला काय दोष? रात्रीच्या कॉफीनंतर दूध विराजनेच फ्रिजमधे ठेवलं नाही म्हणून फाटलं . ओंकारची आलू पराठ्याची फर्माईश आपण पूर्ण नाही करू शकलो हा आपला फार मोठ्ठा गुन्हा झाला का? किंवा पोह्यात मीठ ना पडणं पण..
आपण का एवढी ओझी घेऊन फिरतो पाठीवर आणि डोक्यात? अशाने तर कुठलाच दिवस परफेक्ट असणार नाही. आपण सगळ्यांना आपल्या असण्याची खूप सवय करून दिलीये का? इतकी की आता आपल्यालाच गुदमरायला होतंय..काहीतरी चुकतंय.. ज्या गोष्टींसाठी ती आधी ताईला चिडवत होती ती त्याच गोष्टी आता करतेय. खरंच याची गरज असते का? ती दोघं तर या गोष्टी विसरूनही गेले असतील आणि आपण पुन्हा तोच तोच विचार करतोय. तिचा तिच्याशीच संवाद सुरु होता. आपला आनंद बाह्य घटनांवर अवलंबून नसून आपण आतून प्रसन्न असायला हवं .. असा विचार तिच्या मनात चमकला आणि ती आनंदली.
आनंदी आणि प्रसन्न राहणं आपल्याच हातात आहे..पेक्षा आपण स्वतःचं mind train करायला हवंय का? ओंकारकडे लक्ष देण्यासाठी नोकरी सोडण्याचा आपला निर्णय चुकलाय का? आपण या लहान सहान गोष्टींचा ताण येऊन आपली निर्भयता गमावतोय का? निर्भयता म्हणजे जे जसं आहे तसं स्वीकारणं. आणि आल्या परिस्थितीला आपल्या परीने तोंड देणं .फार बाऊ न करता. कसं होईल याचा विचार न करत राहणं .. त्याने आपण अर्धे खपतो. नाही..असं करून चालणार नाही.. its not me . माझं आयुष्य मलाच मस्त जगायचंय. तिने shoes घातलेत आणि ती जिम मध्ये गेली. एकदम फ्रेश झाली ती. घरी येऊन तिने तिच्या आवडीचं जेवण बनवलं . TV बघता बघता जेवली. बाहेर जाऊन खूप दिवसांची राहिलेली पुस्तकांची खरेदी केली. त्या कोऱ्या पुस्तकांचा वास घेऊन ती तिथेच थोडा वेळ वाचत बसली. ओंकारला परस्पर शाळेतून घेऊन पिझ्झा खायला नेलं. सकाळची तकतकलेली आई न दिसल्याने गडी खुश झाला. दोघं घरी मस्ती करतच आली. थोड्या वेळानी तिघांनाही आवडणारं जेवण बाईंना बनवायला सांगून ती पुस्तक वाचत बसली.
मध्येच आरशात स्वतःला बघून म्ह्नणाली" जमलं की तुला.. निर्भय आणि आनंदी होऊन जगणं.. keep it up .."
निर्भयता म्हणजे जे जसं आहे तसं स्वीकारणं. आणि आल्या परिस्थितीला आपल्या परीने तोंड देणं .फार बाऊ न करता. कसं होईल याचा विचार न करत राहणं .. त्याने आपण अर्धे खपतो. नाही..असं करून चालणार नाही.. its not me