ज्याच्या जवळ जे असतं तेच तो इतरांना देतो. ज्याच्याजवळ आनंद असतो तो इतरांना आनंद देतो. जो सहृदय असतो तो इतरांना प्रेम देतो. ज्याच्याजवळ मत्सर असतो तो इतरांशी मत्सराने वागतो तर ज्याच्याजवळ तिरस्कार असतो तो इतरांशी तिरस्काराने वागतो.
आपण बरेचदा इतरांशी सरळ न वागता त्याची नालस्ती करतो. वाईट साईट बोलतो. जो नाही त्याच्या अपरोक्ष तर बरेचदा परनिंदा करतो. टोमणे मारतो. उपहासाने बोलतो. हे वागणं कधी superiority complex मुळे,कधी न्यूनगंडामुळे तर कधी भयगंडामुळेही होतं. पण हा मनुष्य स्वभाव आहे. या सगळ्याहून दूर असणारा साधू सापडणे दुरापास्तच.
कोणाला इतरांच्या achievements चा त्रास होतो, कोणाला दुसऱ्याची प्रगती त्रास देते. प्रत्येकाला वाटतं कि मी जास्त कष्ट करूनही त्याचं फळ मला मिळालं नाही. पण त्याच वेळी इतरांनी कष्टानी मिळवलेल्या उपलब्धीबद्दल आकस असतो.
डार्विनचा सिद्धांत किती दूरदृष्टीने मांडला होता याची प्रचिती पदोपदी येते. Struggle for existence and survival of the fittest. या दोन गोष्टींसाठी आपण आपला रोजचं जगणं उगाचच complicated करतो. कारण स्वतःशी स्पर्धा करणं कठीण आणि त्याहूनही स्वतःचे दोष पाहणं आणि शोधणं त्याहून कठीण.
लोभ, मोह, मद , मत्सर हे सगळे मानवीय जीवनाचे अविभाज्य अंग आहेत . नाहीतर सगळे देव नसते का झाले? परंतु कायम माणूस अशाच पद्धतीने विचार करीत राहिला तर त्यामध्ये नकारात्मक ऊर्जा तयार होते आणि इतरांच्या चांगल्या किंवा positive attributes चा विसर पडत जातो.
आपण जेव्हा म्हणतो की परमेश्वर सगळ्यांमध्ये आहे तेव्हा त्याचा अर्थ प्रत्येकामध्ये एक तरी गुण असतो. पण अशा नाकारात्मकतेमुळे ते झाकले जातात. समर्थांनी सांगितलेला आत्मसंवाद अशाच वेळी कामी पडतो. कोणीही संपूर्ण वाईट किंवा पूर्ण चांगला नसतो. पण सकारात्मक दृष्टीने वागलं तर रोजचं जगणं जास्त सुंदर होईल.