लहानपणी प्रचंड दारिद्र्यामुळे पीठ आणि पाण्याच्या मिश्रणाला दूध म्हणून पिणारा अश्वत्थामा. पित्याच्या महत्वाकांक्षेचा बळी असणारा अश्वत्थामा. महाभारतात कौरवांचे नेतृत्व करून दैदिप्यमान यश मिळवणारा अश्वत्थामा. अत्यंत मेधावी आणि पराक्रमी असा अश्वत्थामा. अमरत्वाचे भाग्य (?) लाभलेला अश्वत्थामा.
हे इतके असूनसुद्धा कायम दुःखी असणारा अश्वत्थामा.
द्रोणाचार्यांचा एकुलता एक सुपुत्र म्हणजे अश्वत्थामा. गुरुपद मिळण्याच्या अगोदर द्रोणाचार्य अतिशय दारिद्र्यात दिवस काढत होते. परंतु राजाश्रय मिळाल्यानंतर दिवस पालटले. पुत्र प्रेमामुळे पांडवांना विशेषतः अर्जुनाला जी विद्या देत होते त्यापेक्षा जास्त विद्या अश्वत्थाम्याला द्रोणाचार्य देत होते. प्रत्यक्षात कौरव पांडवांच्या शिक्षणाच्या आधीपासून द्रोणाचार्य अश्वत्थाम्याला शस्त्र , शास्त्र आणि अस्त्र देत होते.
द्रुपदाच्या सगळ्या वंशाला पृथ्वीवरून संपविण्यासाठी द्रोणाचार्यानी अश्वत्थाम्याचे माध्यम वापरले. त्यामुळे तो कायम पित्याच्या बुद्धीने चालला. त्याची मानसिक वाढ अपुरी राहिली. तो एकटा पडत गेला. पांडवांना त्याने आपले मित्र मानले तरी शेवटी त्याला त्यांच्या विरोधात युद्ध करावे लागले.
युद्धाचे परिणाम लक्षात घेता दुर्योधनाला युद्ध थांबविण्याची सूचना देखील त्याने केली. परंतु दुर्योधनाने ती धुडकावून लावली. स्वबळावर कौरव सेनेचे नेतृत्व करताना पांडवांच्या अनेक वीरांना कंठस्नान घातले. मुळात अश्वत्थामा महत्वाकांक्षी नव्हता परंतु द्रोणाने ती त्यावर लादली होती.
पांडवांनी अश्वत्थाम्याचा पराभव केला ..तेव्हा त्याला स्वप्नात कावळ्याची अंडी रात्रीतून घुबडाने पळविल्याचे दिसते. त्याचा त्याच्या बुद्धीप्रमाणे अर्थ लावून त्याने झोपेत असलेल्या दुष्टद्युमन आणि द्रौपदीच्या मुलांना झोपेत मारले. महाभारतातील हा नरसंहाराचा नीचांक होता.
याचा परिणाम म्हणून कृष्णाने त्याच्या कपाळावरचा मणी काढून घेतला आणि भळभळती जखम घेऊन अश्वत्थामा अमरत्वाचा शाप घेऊन जगतोय.
धर्मयुद्ध जरी म्हटले तरी मानवी मूल्यांची पायमल्ली झालेली व्यासांनी दाखवली आहे. पूर्वसंचित आणि कर्म याचा परिणाम म्हणजे जगणे. प्रत्यक्ष पिता जरी असला तरी स्वकर्माचे परिणाम स्वतःलाच भोगावे लागतात हेही व्यासांनी सुचविले आहे. युद्धातील नीती - अनीतीच्या रेषा धूसर झाल्या आहेत बरेचदा. आणि यांत पराक्रमी असूनही द्रोणाचार्यांचा पुत्र ही ओळख अश्वथाम्याला पुसता आली नाही आणि शेवटी अमानवीय कृत्य करून बसला.
आजच्या राजकारणाची परिस्थिती बघता असे अनेक अश्वत्थामा समाजात दिसतात पण कायम भळभळणारी जखम देणाऱ्या कृष्णाची कमतरता आहे.