दुर्गा भागवतांचं " व्यासपर्व" पुन्हा एकदा वाचलं. महाभारताचा वेगळा विचार मांडून त्याबद्दल विचार करायला भाग पडणारं लिखाण. प्रत्येक पात्राचं विश्लेषण एका निकषावर आधारित आहे. मुख्य विचारच असा आहे की व्यासांनी काव्य लिहिलं ते द्वापार युगाला अनुसरून. रामायणात जसं चांगला तो चांगला आणि वाईट तो वाईट असं ढोबळ वर्गीकरण केलं गेलं तसं महाभारतात नाही. प्रत्येक पात्रात सत्व-रज आणि तम गुणांचा गुंता आहे. त्यामुळे आजकालच्या भाषेत प्रत्येकाला grey shade आहे. इथेच हा विचार आणि विचारसरणी वेगळी होते. सत्व गुणांचा पालक विदुर हा पण पांडव लाक्षागृहातून सुखरूप बाहेर पडलेत हे सरळपणे धृतराष्ट्राला सांगत नाही. तर तमोगुणांचा प्रतीक असलेला दुर्योधन कर्णाच्या बाबतीत सत्वगुणाने वागताना दिसतो. पांडवांमध्येही या त्रिगुणांची मैत्री आहे.
व्यासांनी लांब लांब अशा शुष्क युध्दवर्णनाबरोबरच लालित्य पण तेवढ्याच ताकदीने मांडलंय त्यामुळेच काव्य म्हणून ते श्रेष्ठ ठरतं असं त्या म्हणतात. कोण कुठल्या वेळी कसा आणि का वागला याची कहाणी आणि इतिहास प्रत्येक ठिकाणी व्यासांनी लिहिलाय. त्यातून त्यांची उत्तुंग काव्य प्रतिभा दिसून येते. त्यात शरपंजरावर असलेल्या भीष्मांचे स्वगत आणि ऐन युद्धभूमीवर अर्जुनाला सांगितलेली गीता हे देखील आले.
पूर्वपीठिका सांगितल्यावर एकेका पात्राचं वर्णन केलं आहे. सुरुवात अर्थातच "पूर्ण पुरुष कृष्ण " यापासून केली आहे. देवकीपोटी जन्मलेला आणि यशोदेघरी वाढणारा हा नटखट बाळकृष्ण कंसाचा वध करतो आणि कालियामर्दन करतो. आपला पुत्र कोणीतरी दैवी आहे हे जाणवेपर्यंत हा बालक एखाद्या मानवी मुलाप्रमाणे लहानपणी सगळ्यांना सळो की पळो करून सोडतो, खोड्या करतो. राधेची मधुराभक्ती स्वीकारणारा , गोपींना वेड लावणारा कृष्ण युद्धात एकही शस्त्र हातात न घेता ब्रह्मांडाचं तत्वज्ञान सर्व जगाला सांगतो. केवढा मोठा आवाका. बुद्धीचा आणि व्यासांच्या कल्पनाशक्तीचा देखील.
गीतेच्या माध्यमातून " कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन " एवढं मोठं जगण्याचं वास्तव आणि सार सांगणारा कृष्ण हा केवळ अर्जुनाचंच नाही तर समस्त समाजाचं सारथ्य करतो. समाजाला दिशा देतो. जगण्याचं आणि लढण्याचं बळ देतो. स्वजन जर अधर्माच्या मार्गावर असतील तर युद्ध करणे योग्य आहे हे अर्जुनाच्या मनावर बिंबवत राहतो. कृष्ण खरंच होता की ते केवळ कवीने रंगवलेले पात्र आहे या वादात न पडता त्याद्वारे सांगितलेला गर्भितार्थ लक्षात घेणं जास्त गरजेचं आणि संयुक्तिक आहे. दुर्गाबाई हा सगळा पसारा व्यासांनी मांडलाय याबद्दल जास्त ठाम आहेत.
महाभारताचा काळ हा सत्ययुग आणि कलियुगाच्या मधला आहे. त्यामुळे सत्ययुगातले विचार आणि कलियुगातले विकार यांची सरमिसळ महाभारतात सापडते. सर्व मानवी गुण दोषांचे वर्णन केले असल्यानेच "व्यासोच्छिष्ट्म जगत सर्वम " असे म्हणतात ते यामुळेच. व्यासांच्या उत्तुंग प्रतिभेचे दर्शन दुर्गाबाईंनी घडवले. अभ्यासपूर्वक विश्लेषण केले. संदर्भ शोधले. म्हणून जास्त भावले. आणि मी या पुस्तकाच्या अधिकाधिक प्रेमात पडत गेले.
एकेका पात्राचे विश्लेषण पुन्हा केव्हातरी ...