कुमुद जोशी , कुमुदिनी इंदूरकर आणि माझी आई ही सगळी एकाच व्यक्तीची रूपं असली तरी प्रत्येक रुपाला वेगळा आयाम आहे . तिघींमधे साम्य म्हणजे अल्प समाधानी, हसरी आणि सोशिक . पण तिघींनाही आपलं एक अस्तित्व होतं.. चार चौघात उठून दिसणारं. सौम्य, सर्व-समावेशक आणि पारदर्शक.
कुमुद जोशी म्हणजे ७ भावंडांपैकी एक. अत्यंत हुशार. मवाळ . आपण बरं आणि आपलं काम बरं अशा स्वभावाची. सतत कुठल्यातरी कामात स्वतःला गुंतवून ठेवणारी. मोठ्या भावंडांचा आदर आणि लहान भावंडांवर माया करणारी. आजोबांची विशेष लाडकी कारण अभ्यासू वृत्ती. स्वतः शेतकरी असून शिक्षणाचं महत्व जाणणारे आजोबा जास्त लक्षात आहेत माझ्या. सगळ्या मामा- मावशांचं खूप प्रेम होतं कुमुद वर.
लग्न करून कर्तृत्ववान , हुशार अशा प्राध्यापक विश्वनाथ इंदूरकरांकडे आली . त्या काळात एम ए झालेली हुशार बायको लाभली प्राध्यापकांना. स्त्रीचं वेगळं अस्तित्व असावं अशा विचारांचे असून सुद्धा तेव्हाची परिस्थिती लक्षात घेता पूर्ण वेळ नोकरी करणं शक्यच नव्हतं कुमुदिनीला. आजारी सासू, शाळा-कॉलेजात जाणारे दीर , लग्नाच्या नणंदा अशा सगळ्या धबडग्यात कुमुदिनी स्वतःची space मिळवू पाहत होती. कारण बुद्धिजीवी माणसाला स्वतःचा एक आतला आवाज कधी स्वस्थ बसू देत नाही . दुपारचा वेळ तिने स्वतःचं वाचन, लिखाण यात घालवावा यासाठी प्राध्यापक हि प्रोत्साहन देत .
दुपारी १२ नंतर स्वयंपाकघरात काम करू नकोस असं सांगत. ' तुम्हाला घरात राबायला बाई हवी होती ' असं म्हणायची पण .. परंतु दोघांचं bonding काही वेगळ्याच पातळीवर होतं . दोघांनी मिळून सांसारीक जबाबदाऱ्या पार पाडल्या. दोघांनाही सामाजिक कामांची आवड होती. आपापल्या कक्षा निवडून दोघंही सामाजिक कामात रस घ्यायचे. त्यातूनच राष्ट्र सेविका समितीचं काम करायला लागली. त्याचं श्रेय प्राध्यापकांना द्यायला हवं. त्या दोघांच्या वैचारिक चर्चांचा, अभ्यासू वृत्तीचा आम्हा बहिणींवर परिणाम होत असे अगदी नकळत..
अक्षर फार सुंदर होतं तिचं . राष्ट्र सेविका समितीचं " धृती" नावाचं एक हस्तलिखित होतं . संपूर्ण स्वतःच्या हाताने लिहायची . त्यासाठी लेख , कविता मिळवायची, संपूर्ण दासबोध स्वहस्ते लिहून काढला होता. सज्जनगडावरून चालणाऱ्या परीक्षा दिल्या, त्याची समीक्षक झाली आणि आपली एक extended फॅमिली तयार केली.
माझी आई .. आम्हा पाच बहिणींच्या शिक्षणाबद्दल जागरूक. आम्ही आमच्या पायावर उभं राहायला पाहिजे यासाठी धडपडणारी .. कधी अभ्यास घेतल्याचं आठवत नाही पण घरात अभ्यासाचं वातावरण होतं .वाढत्या वसायानुसार पडणाऱ्या प्रश्नांना उत्तर देत होती. कधी वादावादी झालीच तर शेवटी " चल काहीतरीच बोलते ' असं म्हणायची. कधी गंमतही यायची तिला चिडवायला.
शाळेतून आल्यावर व्हरांड्यात बसलेली असायची..काहीतरी वाचत किंवा लिहीत. पुढे कळत गेलं की हाच तिचा " me time " होता. तब्येतीने शारीरिक हालचालींवर बंधनं आलीत पण मन मात्र उंच भराऱ्या मारत होतं . राहिलेलं शिक्षण पूर्ण केलं. युनिव्हर्सिटीचं गोल्ड मेडल मिळवलं . amazing फीलिंग होतं ते. आमच्या अभ्यासातल्या प्रगतीने आनंदित व्हायची खूप. बाबा तर आपल्या उद्योगात असायचे पण तिचं सगळ्या मुलींकडे नेटाने लक्ष असायचं . आता विचार केला तर वाटतं की सगळ्यांचा विचार करून सगळं घर बांधून ठेवणं किती कठीण असेल. माणसं बांधल्या गेली होती आमच्या घराशी. खूप काम पडायचं पण या सगळ्याचा तिच्या चेहऱ्यावर एव्हढासाही ताण नसायचा
आमची शिक्षणं चालू असतानाच अचानक तिची तब्येत critical झाली आणि ती पटकन निघून गेली. आज तिला जाऊन २४ वर्ष झालीत . पण एकही दिवस असा जात नाही कि आत मुरलेली ती स्वतःच अस्तित्व भासवत नाही. चांगलं - वाईट यातला फरक जाणायला तिने शिकवलं होता. काहीही करताना आधी एक चांगला माणूस व्हा , स्वतःचा विकास करत राहा, अभ्यास करत राहा, उद्योगी राहा आणि आनंदी राहा.. अशा आणि इतर अनेक गोष्टी सतत आठवत राहतात कधी मरगळ आलीच तर हलवून जागं करते.. never give up,,असं सांगत असते.
काळ पुढे सरकत असतो..सगळ्या जखमांवर फुंकर घालतो... सगळ्या theoretically मान्य असलं तरी एक जाणवत राहतंच .... ती हवी होती ....
3 Comments
Very beautiful All emotions touch the reader Though I never saw her but felt her through everyone’s discussions n memmories
वाचता वाचता आईंची पूर्ण व्यक्तिरेखा उभी राहिली । खूपच प्रतिभावान होत्या – तुम्ही सर्व खूप भाग्यवान आहात ।
ह्या मनोगता मार्फत त्याची ओळख आम्हाला झाली ! त्याच्या स्मृतीस नम्र अभिवादन ।
होय् । डॉ. मीनल माझ्या सारख्या विद्यार्थीनीला सुद्धा त्यांनी प्रेमाने आणि ज्या सहजतेने संस्कृत सारखा विषय अभ्यास म्हणून गंभीरपणे नव्हे तर हसत खेळत शिकवला त्याला तर तोडच नाही . खूप खूप आठवणी आहेत त्यांच्या सोबत घालवलेल्या क्षणांच्या , त्यांच्या सहवासाच्या ! त्यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन !