तिचा गळा गोड होता लहानपणापासून. शाळेतल्या शिक्षकांनी बरेचदा सांगितल्यावर आईने तिला गाणं शिकायला पाठवलं. ती मनापासून गाणं करत होती. शास्त्रीय संगीतात तिला जास्त रुची होती. बरीच वर्ष सातत्याने गाणं केलं तिने. काही स्पर्धांमधून बक्षिसं मिळवली. गाणी व्हायला लागली तिची. मुळातली "उभरते कलाकार" म्हणून तिने नाव कमावलं. चांगली सातत्याने तालीम घेतली. रोजचा रियाज नेमाने करत होती. साधनेशिवाय कला साधणार नाही हे तिला माहित होतं .
आता पुढे काय?
तिचं गाणं करावं म्हणून ती लोकांना भेटायला जायची स्वतःची CD आणि profile घेऊन. रियाज अखंड चालूच होता. तिला वाटायचं की organisers ते वाचतील, CD ऐकतील आणि आवडलं / नाही आवडलं तर कळवतील. पण असं काही घडत नव्हतं. काही दिवसांनी/ महिन्यांनी ती त्यांना phone करायची किंवा भेटायला जायची तेव्हा तिला मिळालेली उत्तरं फारच मजेशीर असायची.
एक उत्तर ..तुम्ही फार famous नाही किंवा अगदी उदयोन्मुख नाही. "तुमचं गाणं ठेवता येणार नाही " असा छुपा संदेश. गाणी झाल्याशिवाय "फेमस " कसं होता येईल याचा ती विचार करत राहायची कारण "उदयोन्मुख नाही " हे certificate मिळालं होतं.
दुसरं उत्तर " तुमची CD नीट ऐकू येत नाही ..ऐकता नाही आलं". म्हणजे १-२ महिने वाट बघणं फुकट. मध्ये फोन केला तर " वेळ मिळाला की ऐकतो आम्ही." असंही.
तिसरं उत्तर " आम्ही ठेवू तुमचं गाणं अर्धा तास पण आमच्याकडे पैसे नाहीत. आम्ही तुम्हाला पैसे देऊ शकणार नाही". ती मान्य करते . पण त्याच वेळी तिच्यासमोर वादकांना बिदागी दिली जाते. आणि "तुमच्या गाण्यात कशी सुधारणा होईल " याबद्दल छानसं lecture.
चौथं उत्तर आणखी मजेशीर " आमच्याकडे मोठी waitlist आहे, कमीत कमी २ वर्षांची ". असेल बुवा. तिला थोडा सुखद धक्का बसला. या चक्रात आपण एकटेच नाही असं जाणवून. खरंच इतके लोक approach करतात ? इतके लोक शास्त्रीय संगीत करतात? संस्थांना कार्यक्रम करण्यासाठी सांगतात ? की २ वर्ष आपल्या turn साठी वाट पहावी लागेल? देव जाणे.
आता पाचवं उत्तर. " आमच्याकडे जवळपास २०० CDs आहेत. आम्हाला ऐकायला पण वेळ नाही " बापरे.. आपण जन्म घ्यायला उशीर केला असा वाटायला लागतं.
आता सहाव्या उत्तराकडे वळूया .. तिने त्यांच्या ऑफिसमध्ये फोन केला. अनेक महिने टोलवाटोलवीची उत्तरं मिळाल्यानंतर एक दिवस उजाडतो जेव्हा मीटिंग फिक्स होते. हे सगळं ती स्वतः try करत असते कारण राजमार्गाने जाणं तिला पसंत असतं. प्रत्यक्ष भेटून आपलं गाणं ऐकवून त्यांना योग्य वाटलं तर ते गाणं ठेवतील असा तिला अनेक वर्ष विश्वास होता आणि अजूनही आहे.
हां तर मीटिंग ला वेळेत पोहोचल्यावर कळतं की समोरच्या व्यक्तीच्या आपण खिजगणतीतही नाही. तरी ती चिवटपणे जाते ऑफिसमध्ये. आपल्या CDs घेऊन जाते. गाणं ऐका म्हणते. आपलं profile देते. आपल्याचसमोर ऐकून " हे यांच्यासारखं वाटतंय , ते त्याच्यासारखं वाटतंय " अशी यथेच्छ नालस्ती आपल्याच समोर केली जाते. १०-१५ मिनिटांची ही मीटिंग. "तुमच्या संस्थेचा प्लॅटफॉर्म गाण्यासाठी उपलबध झाल्यास अनेक जाणकारांसमोर कला सादर करण्याचा आनंद मिळेल "यात कुठेही मॉनिटरी gain चा उच्चारही नाही. छुपा उद्देशही नाही.
यावर "हे CD वगैरे ठीक आहे पण तुमची स्टेज वरची कलाकारी बघायला आवडेल " असं एक उत्तर येतं. जी व्यक्ती भेटायलाच तयार नाही ती खरोखर दुसरीकडे आपल्या गाण्याला येईल का" असा विचार करत ती तिथून निघते. नकार देण्याचा आणखी एक नवीन प्रकार. जाताना " माझा नंबर कुणी दिला? असा पण एक प्रश्न आला. " सर हा तुमच्या ऑफिसचा नंबर सगळीकडे available आहे. " माझ्याकडे तुमचा पर्सनल नंबर नाही" असं नम्रपणे ती सांगते. आवर्त संपत नाही .
आणखी एक गमतीशीर अनुभव . जेव्हा कुठल्यातरी महोत्सवात गाण्यासाठी approach करायला गेलं की "तुम्ही कुठून आलात?" असा एक अविर्भाव असतो organisers च्या चेहऱ्यावर. म्हणजे " तुम्हाला कुणाचा jack नाहीये.."
म्हणजे PR मध्ये आपण फारच मागे पडलोय असं वाटत राहतं. किंवा कोणीतरी आपल्याविषयी त्यांना सांगायला हवं. डायरेक्ट आलात म्हणजे तुमच्या गाण्यात काहीतरी कमी आहे. " हे असं नसतं काही " असा एक अविश्वास असतो बोलण्यात. कारण यात structured असं काही नसतं. या महोत्सवांच्या बाबतीत आणखी एक हमखास येणारं उत्तर म्हणजे " आमच्या हातात काही नाही" आणि "परदे के पीछे कोण आहे" हे कळायला काही मार्ग नाही.
या सगळ्या अग्निदिव्यातून पार पडल्यानंतर यदा कदा तुम्ही गाणं continue केलं आणि कुठे गाणं झालं की " तुम्हाला पहिल्यांदाच ऐकलं हो.. नवीन आहात का? बाकी कुठे फारसं ऐकलं नाही तुम्हाला..छान गाता तुम्ही . तुमच्या गुरूंना नमस्कार सांगा. आणि प्रवास सुरु राहतो..तुम्ही mid -age मध्ये पोहोचता आणि मग लोक म्हणतात .." या फील्ड मध्ये चाळीस नंतरच काही मिळायला लागतं.. फार कष्ट आहेत .."