द्वापारयुगात घडलेलं महाभारत आणि सत्ययुगात घडलेलं रामायण. यात मुळातच फार मोठा फरक आहे. दोन्ही महाकाव्य आपापल्या ठिकाणी श्रेष्ठ, मानवी जीवनाशी आणि मूल्यांशी निगडीत आहेत. सत्ययुगात एकेका पात्राला एकच रंग-छटा आहे. परंतु महाभारतात अनेक उपकथा आहेत आणि त्याचे संबंध एकमेकांशी जोडले गेले आहेत. या सगळ्या कथा-उपकथांची इतिश्री शेवटच्या धर्म युद्धात होते. हे युग कलियुगाच्या जवळ येत असल्यामुळे त्यातील मानवी संबंध, जीवनावरची श्रद्धा यांनादेखील अनेक छटा आहेत.
महाभारतातील युद्ध घडण्यासाठी कारणीभूत असणाऱ्या अनेक पात्रांपैकी अतिशय महत्वाचं पात्र म्हणजे द्रौपदीचं. बुद्धिमान, सौंदर्यवती, पांडवांशी कुठल्याही परिस्थितीत समाधानाने राहणारी ही श्यामवर्णी स्त्री म्हणजे एक गूढ आहे. शंकराची आराधना करून "मला माझ्या पती मध्ये प्रामुख्याने पाच गुण हवेत " असा वर मागून घेणारी. धर्माने वागणारा, शक्तिशाली ,धनुर्धर, सुंदर आणि संयमाने वागणारा. त्या काळातील सामाजिक संकेतानुसार हे पाचही गुण एका व्यक्तीमध्ये सापडणार नाहीत म्हणून भगवान शंकराने तिला सांगितले "तू पाच पतींना वर" या उपकथेनंतर घडून आलेलं तिचं स्वयंवर ज्यात श्रीकृष्ण देखील हजर होता. परंतु त्याने ब्राम्हण वेषातील पांडवांना ओळखून स्वयंवरात भाग घेतला नाही. .
कुंतीने कशा पद्धतीने सांगितले, काय सांगितले याच्या अनेक कथा, दंतकथा आहेत परंतु पाच पतींना वरणारी पतिव्रता शोधून देखील सापडणार नाही. दुसरं आणखी एक नवल म्हणजे जरी अर्जुनाने द्रौपदीचा पण जिंकला तरी देखील संपूर्ण महाभारतामध्ये त्या दोघांचा संवाद असा दिसत नाही.
श्रीकृष्ण तिचा सखा, मार्गदर्शक होता. परंतु त्याचं दैवी रूप ठाऊक असलेली द्रौपदी अपमानित होत असताना कृष्णाचा परमेश्वर म्हणून धावा करते आणि तो भरसभेत तिची लाज राखतो. अज्ञातवासात असताना "तुझ्यावर अन्नपूर्णा कायम प्रसन्न राहील" असा वर देतो. त्यामुळे अनेक कठीण परिस्थितीत द्रौपदी गृहिणी पद उत्तम सांभाळते.
"स्वतःला पणाला लावले असताना मला पणाला लावू शकत नाहीस" असे युधिष्ठिराला ठणकावून सांगून सभेतील ज्येष्ठ व्यक्तींना देखील ठामपणे प्रश्न करणारी द्रौपदी अत्यंत तेजस्वी आहे. प्रातः स्मरणीय आहे. युधिष्ठिराबरोबर तर्कशुध्दतेने चर्चा करणारी, भीमाचा राग कायम प्रज्वलित ठेवणारी, नकुल सहदेवाचा सांभाळ करणारी अशा अनेक छटा असणाऱ्या स्त्रीचं पात्र व्यासांनी रंगवलं आहे.
युद्धाने सगळं मानवी जीवन उध्वस्त होईल, काहीही उरणार नाही. हे पदोपदी सांगूनही द्रौपदीने युधिष्ठिराला बोल लावले आणि भीम आणि अर्जुनाचा राग सतत जागृत ठेवला. द्रुपदाची कन्या, पांडवांची पत्नी, धृष्टद्युम्नाची बहीण असून देखील कायम कष्टप्रद जीवन घालवणारी अशी ही द्रौपदी. अश्वत्थाम्याने द्रौपदीची मुलं रात्री झोपेत मारली. अभिमन्यूला कपटाने मारले. यानंतर "माता" म्हणून द्रौपदी आणि सुभद्रेनी केलेला विलाप देखील हृदय द्रावक आहे. स्त्रीचा आणि स्त्रीत्वाच्या अपमानाचे पर्यवसान सर्वनाशी अशा अठरा दिवसांच्या युद्धात झालं. पाच पतींची पत्नी असूनदेखील तिला स्वत्व जपण्यासाठी कृष्णाला शरण जावं लागलं आणि कृष्णदेखील तिच्यासाठी मानवी रूप घेऊन तिचा "सखा" झाला.
या युगातही आपण सीता द्रौपदी यांना देव्हाऱ्यात तर ठेवतो. परंतु समाजातल्या स्त्रियांचा आणि स्त्रीत्वाचं रक्षण करण्यास असमर्थ ठरतो. आजची स्त्री स्वसंरक्षणासाठी शारिरीक आणि मानसिकरित्या समर्थ आहे का? की तिला अजूनही कृष्णाचा धावा करावा लागणार? किंवा एखादं युद्ध घडण्यासाठी कारणीभूत व्हावं लागणार?
2 Comments
सुंदर लिहिले आहे……पुढील लिखाणाची वाट पहात आहे
खुप छान