नुकतंच इव्ह क्युरी हिने मादाम क्युरी आणि पिएर क्युरी यांच्यावर लिहिलेलं पुस्तक वाचलं. मी डॉ अश्विनी भिडे-देशपांडे यांनी लिहिलेला मराठी अनुवाद वाचला. झपाटल्यासारखं वाचून काढलं आणि थक्क झाले. केवळ विज्ञान आणि विज्ञानाचाच विचार करणारं हे जोडपं. परस्परपूरक काम करणारी ही दोघं. स्वतःच्या आयुष्याचं ध्येय खूप आधी माहिती असणारं हे जोडपं. एकाच वेळी मूलभूत संशोधनाकरिता दिल्या जाणाऱ्या सर्वोच्च अशा नोबेल पुरस्काराने सन्मानित. मेरी क्युरी ला तर दोन नोबेल पारितोषिकं आहेत. अनेक वर्षांचे रेकॉर्डस् तोडले तिने. पहिली महिला नोबेल पारितोषिक विजेती. आणि दुसरी म्हणजे तिचीच मुलगी आयरिन.
अक्ख्या मानवजातीवर उपकार करून ठेवले आहेत या दोघांनी. कर्करोगावरील उपचारपद्धतीसाठी लागणारा "रेडियम" शोधून काढला. त्याचे सगळे गुणधर्म पडताळून पहिले. अनेक आणि अखंड प्रयोगांनी ते सिद्ध केले. त्याचं बारसं देखील त्यांनीच केलं
अतिशय अनमोल आणि दुष्प्राप्य असा "रेडियम" शोधायला लागणारा संयम, वर्गीकरणाच्या पद्धती, प्रयोगांसाठी लागणारं logic हे सगळं त्यांच्याकडे होतं. अपुरी साधनसामग्री, पदोपदी असणारी आव्हानं, जवळपास कफल्लक अशी ही जोडगोळी कित्येक वर्ष प्रयोगशाळेमध्ये दुर्दम्य साहसाने आणि प्रचंड आत्मविश्वासाने काम करत होती.
एकमेकांबद्दल आदर बाळगून हे पती पत्नी भारावल्यासारखे काम करत होते. आणि "युरेका" moment आल्यानंतरही "राष्ट्रार्पणमस्तु" या भावनेने तो १ ग्राम रेडियम त्यांनी पुढील संशोधनासाठी, वैद्यकीय पडताळणीसाठी निस्पृहपणे देऊन दिला. कुठलंही पेटंट न घेता. आपल्या प्रत्येक संशोधनाचं पेटंट घेणारे शास्त्रज्ञ कुठे आणि "रेडियम ही काही एकाची मालकी नाही. त्यावर संपूर्ण जगाचा हक्क आहे" असं ठासून सांगणारी शास्त्रज्ञ कुठे. त्याकाळी त्याची किंमत १ लाख डॉलर्स इतकी असताना सुद्धा त्याबद्दल एक पै ही कोणाकडून घेतली नाही. विज्ञानाचा उपयोग केवळ आणि केवळ मानवजातीच्या उद्धारासाठी व्हावा हा उदात्त आणि विशुद्ध हेतू.
अतिशय साध्या पद्धतीच्या आयुष्याची आखणी करून अतिशय कष्टाने आणि विपरीत परिस्थितीशी झगडून आपलं संशोधन त्यांनी सातत्याने चालू ठेवलं. स्वतःचे खर्च अतिशय मर्यादित ठेवून आपली ऊर्जा, वेळ आणि बुद्धी यांची सांगड घालून एका सकारात्मक उद्देशासाठी झपाटणारं हे जोडपं जगावेगळंच होतं. कित्येकांच्या आयुष्याला वळण लावणारं, inspire करणारं होतं आणि अजूनही आहे.
पुस्तक त्यांच्याच मुलीने छानच लिहिलं आहे. मराठी अनुवाद पण उत्तम. अनेक संदर्भ, त्याकाळची परिस्थिती नजरेसमोर येते. व्यक्तिचित्रण ही नीटस केलंय. मादाम क्युरीची एक छबी तयार होते. अनेक चित्रात दिसणारं चेहऱ्यावरचं बुद्धिमत्तेचं तेज, स्वभावातले कंगोरे, ठामपणा तरीही नम्रता लेखनातूनही जाणवते. तरीही खूप लिहिण्यासारखं आहे, समजून घेण्यासारखं आहे हे जाणवत राहतं.
पिएर क्युरींच्या अपघाती निधनानंतर अधिक कणखरपणे जगाचा सामना करणारी, मुलींच्या संगोपनाबरोबरच अनेक विद्यार्थ्यांच्या संशोधनासाठी मार्गदर्शन करणारी, महायुद्धाच्या वेळी अनेक जखमी जवानांसाठी xray मशीन्स ठिकठिकाणी घेऊन "राष्ट्र प्रथम" या भावनेनी फिरणारी, पट्टीची पोहणारी, मैलोन्मैल सायकलनी फिरणारी, रेडियम इन्स्टिटयूट साठी सतत झटणारी, दिवसाचे १४-१६ तास काम करणारी, रोज नवीन आव्हानं पेलणारी तरीही निराश न होणारी, भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्र या दोहोंमध्ये तेवढ्याच वकुबाने काम करणारी ही स्त्री संशोधिका आणि अनेक research पेपर्सची लेखिका खरोखर झपाटून टाकते. खूप ऊर्जा देऊन जाते.
आज आपल्या देशात अजूनही स्त्री संशोधिका फारच कमी आहेत. विज्ञान आणि तंत्रज्ञान यांचा अभ्यास करणाऱ्या सगळ्यांनी वाचावं असं हे पुस्तक "मादाम क्युरी"...
मला जिने भेट दिलं त्या मैत्रिणीला मनापासून धन्यवाद !
1 Comment
Minal, nicely written, you have exactly captured and expressed the passion of the Curie’s couple. Keep writing