स्वातंत्र्य मिळून साठ वर्ष उलटून गेलीत . पण अजूनही महिलांना आपल्या हक्कांसाठी झगडावं लागतंय. जे हक्क समाजाने पुरुषाला सहज दिलेत ते स्त्रीला देण्यासाठी अजून मानसिकता तयार होत नाही हे मोठं दुर्दैव आहे आपलं. पण या विषयाला अनेक कंगोरे आहेत.
एक पहिलं आणि महत्वाचं म्हणजे या बाबतीत स्त्रीला स्वतःला असलेलं भान . यातही ग्रामीण आणि शहरी स्त्रियांचा मुद्दा वेगळा. ग्रामीण स्त्री बिचारी जरी नसली तरी एका व्यवस्थेचा भाग म्हणून अनेक हक्कांपासून वंचित आहे . ग्रामीण जीवनमान सुधारलं तरी त्या प्रमाणात स्त्रीचा जीवनस्तर उंचावला का . या प्रश्नाचं उत्तर अजूनही आकडेवारीत पाहिलं तर कमीच अहे.
शहरी स्त्रिया या बाबतीत पुढे आहेत. त्यांना आत्मभान अहे. स्वातंत्र्य आहे वागण्या - बोलण्याचं , स्वतःचे निर्णय स्वतः घेण्याचं . यामध्ये शिक्षणाचा मोठा हातभार लागलाय. विचार आचाराचं स्वातंत्र्य आहे . पण शहरी भौतिक जीवनशैलीत अडकलेल्या स्त्रियांची मानसिकता काय आहे ह्याचाही विचार व्हायला हवा. सावित्री बाईंनी स्त्री शिक्षणाची कास आणि आस धरली म्हणून हे दिवस दिसले . तेव्हा स्वातंत्र्य आणि स्वैराचार यात काही गफ़ल्लत तर होत नाही ना असा प्रश्न प्रत्येक स्त्रीने स्वतःला विचारायला हवा.
जर सारासार विवेकबुद्धी जागृत होत नसेल, निर्णय क्षमता येत नसेल तर आपल्या मूळ उद्देशालाच धक्का लागतोय. केवळ कपड्यांच्या बाबतीतली , दारू, cigarette पुरुषांच्या बरोबरीने पिण्यातील स्वातंत्र्य म्हणजेच स्त्री स्वातंत्र्य असा संकुचित अर्थ जर स्त्री काढत असेल तर फार मोठी चूक करतेय आजची स्त्री.
दुसरी म्हणजे पुरुष आपला मुख्य शत्रू अहे. त्याच्यावर वरचढ काहीतरी करून दाखवायचं अशीही ईर्ष्या असते. इथेही गल्लत होते. का असलेली रेष मिटवण्याचा अट्टाहास? पण बरेचदा संकुचित विचार करून आपली क्षमताच कमी करण्याचा घाट स्त्रीच घालते
आपल्या शिक्षणाचं काय योगदान आपण देवू शकतो याचा विचार व्हायला हवा. याचा अर्थ मी स्त्रीवादी नाही, पुरुषप्रधान संस्कृतीचा पुरस्कार करते असा नाही. पण स्त्री शिक्षण हा आता प्रश्न राहिला नसून शिक्षणाने स्वतःच्या आणि सुदृढ सामाजिक जाणिवांचा विकास कसा करू शकतो हा आहे.
जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने अनेक पातळ्यांवर यशस्वीरीत्या लढणाऱ्या झाशीच्या राण्यांना माझा सलाम!