दहावीत असताना एक निबंध लिहायला सांगितलं होतं ." देव-सत्य की भास?" दहावीच्या मानाने विषय जडच होता.पण मी लिहिल्याचं आठवतंय . नक्की काय लिहिलं ते आठवत नाहीये पण तेव्हाही विश्वास आणि श्रद्धा या बाबतीतले थोडे विचार पक्के झाले होते कदाचित.
देव,परमेश्वर हे नक्की आहेत का? असलेच तर ते सगुण की निर्गुण?
मानवी स्वभावानुसार निर्गुणावर भक्ती/श्रद्धा ठेवणं फार कठीण आहे. त्यामानाने सगुण भक्ती जरा आवाक्यातली. काहीतरी समोर पाहिजे. म्हणून डोळ्यासमोर मूर्ती हवी..मग ती कशी हवी तर माणसासारखीच हवी.. म्हणून राम - कृष्ण घडले.. आपण त्यांना आपल्या श्रद्धेने देवत्व बहाल केलं.
कितीही स्वतःला नास्तिक समजणारी व्यक्ती कुठे ना कुठे स्वतःला surrender करत असते ... म्हणजे ती श्रद्धा का? दोन्ही गोष्टींना आधार काय तर माणसाचा विश्वास. असण्यावर आणि नसण्यावरही.
अल्लाह तेरो नाम..ईश्वर तेरो नाम ..सबको सन्मती दे भगवान.. लताबाईंचे सूर कानावर पडले की एका ट्रान्स मध्ये जायला होतं..घरातल्या देव्हाऱ्यातील दिव्यापुढे हात आपोआप जोडले जातात. एखादं चित्र पाहताना गुंगून जायला होतं. सुरेल भैरवी ऐकताना डोळे बंद होतात. एका अनंताची ओढ़ लागते. हे सगळं काय ? तर न दिसणाऱ्या गोष्टींसाठी आपण स्वतःला विसरतो. हेच तर निर्गुण.
माझ्या दृष्टीने घरातला आणि मनातला एक कोपरा नक्कीच श्रद्धेचा असावा. स्वतःच्या कर्त्तृत्वावर अपार विश्वास असूनही एक टक्का त्याच्याजवळ असतोच.त्याला मान द्यावा. तुम्ही सतत कुठल्या तरी ध्येयाचा ध्यास घेतलात की तो मदत करणारच. पण त्यासाठी patience मात्र खूप ठेवावा लागतो. प्रार्थनेतला एखादाच क्षण साधतो.
त्यामुळे असणं आणि नसणं हे जरी RELATIVE असलं आणि दोन्हीही PROVE झालं नसलं तरी सत्प्रवृत्ती आणि दुष्ट प्रवृत्ती याचं भान जरी आलं तरी बराच खेळ जमला असं म्हणू या का?