उत्तम संगीताची आवड असणारं आमचं घर आहे. माझ्या सासऱ्यांना उत्तम, कसदार, श्रवणीय संगीत मग ते गाणी असो,वाद्य असो.. असं ऐकण्याचा आणि collection ठेवण्याचा नाद होता. नागपूरला त्यांना जिथून मिळे तिथून ते गाण्यांच्या records जमवीत. त्या रेकॉर्डस् जीवापलीकडे जपत. त्यांचा labeling, numbering एकदम त्यांच्या शिस्तीप्रमाणे करीत. त्यात भरपूर रमत.
त्यांनाच बघत मोठा झालेला अमोल (माझा नवरा ) ..हाही तसाच व्यासंगी. कुठलीही गोष्ट करेल तर त्यात झोकून देईल. या त्याच्या स्वभावाचा मला नेहमीच हेवा वाटतो..तर सांगायचा मुद्दा असा की.. या डिजिटल युगात प्रचंड tech savvy असणाऱ्या त्याने गेल्या महिन्यात रेकॉर्ड प्लेअर आणलं घरी.. आणि जणू काही तो काही वर्ष मागे गेला. लहानपणी ऐकलेल्या सगळ्या records त्याला पाठ आहेत..कुठल्या गाण्या नंतर कुठलं गाणं हे मुखोद्गत आहे. आणि त्याने मग रेकॉर्डस् मिळवण्याचा सपाटाच लावला.
जगात समविचारी लोकांची कमी नाही. त्यामुळे प्रचंड रेकॉर्डस् चा साठा असलेल्या अनेक लोकांशी तो connect झाला आणि मग जसा वेळ मिळेल तसा तो त्या माणसांकडे जाऊन आपल्याला हव्या त्या रेकॉर्डस् आणणे . त्याचं लॅबेलिंग, नंबरिंग करणे यात बराचसा सुट्टीचा वेळ घालवू लागला . मुंबई, दिल्ली, जयपूर, पुणे, कानपूर येथे अशा अनेक असामी सापडल्या कि ज्यांच्याकडे हजारोंनी हा खजाना आहे ..online forums आहेत. हा त्या सगळ्यांशी कनेक्ट झाला. बघता बघता रेकॉर्डस् नी शंभरी गाठली.
हा नवीन मेंबर आल्यापासून आम्ही फक्त रेकॉर्डस्च ऐकतोय..TV पाहणं कमी झालाय.मुलंही रमली आहेत यात. त्यात अमीर खान साहेबांचा मालकौंस , किशोरीताईंचा सहेला, वसंतरावांचं मृगनायना , अख्तरीबाईंचं ए मोहब्बत असे कितीतरी हिरे आहेत. मीही त्यात सहभागी होऊन माझ्या लहानपणी ऐकलेल्या कित्येक राग ,बंदिशी , गाणी यांचा संग्रह केलाय. पण वेड म्हणावं तर त्यालाच.
मग विचार केला हे सगळं music आमच्याकडे आधीपासून होतंच. सगळ्या forms मध्ये होतं मग आता काय नवीन ?
तर व्यासंग. कुठल्याही गोष्टीचा व्यासंग करायचा तर ती गोष्ट जितकी दुरापास्त तितकी मिळवण्यातला आनंद जास्त. हेच काही दिवस आम्ही अनुभवतोय. यातला आनंद ज्याचा त्यालाच कळतो आणि मिळवता येतो.सुदैवाने ही passion आमच्याकडे through genes आलीये आणि पुढची पिढीही त्यात सहभागी होतेय.