आपण आपल्या मनाशी कितीदा बोलतो?
इतरांशी अनेक विषयांवर अखंड बोलत असणारे आपण स्वतःशी सुसंवाद करतो का?
इतरांशी वाद घालणारे आपण मनाशी भांडतो का?
या मनाच्या अनेक तऱ्हा असतात. कधी टोकाची भूमिका घेऊन आपल्याशी प्रचंड वाद घालतं तर कधी तुझंच बरोबर आहे याची ग्वाही देतं . कधी अख्या विश्वात मुक्त भ्रमण करतं तर कधी अगदी सूक्ष्म गोष्टींची गुंतागुंत सोडवतं किंवा घडवतं. खरंच द्वैत - अद्वैत असं काही असतं का? की कायम द्वैतच असतं ?
मनाला वळण लावावं लागतं बाकी. सतत भरकटणाऱ्या मनाला बुद्धीची वेसण घालत रहावं लागतं. कधी आपल्याला आपण किती बिचारे आहोत असं सांगत असतं तर कधी आपण फारच ग्रेट वगैरे आहोत असं सांगत असतं. फारसं मनावर घ्यायचं नसतं ते . पण आत्मविश्वास वाढतो त्यामुळे.
कुठल्याही कृतीचा उगम म्हणजे मन. कुठल्याही कृतीचा परिणामही मनावरच होतो. एक अक्ख मानस शास्त्र develop केलंय आपण. तरीही सगळ्या कक्षा काही कवेत येत नाहीत. मन त्यातूनही निसटतं. मनाची गती कशाशीही स्पर्धा करू शकत नाही. पण कधी कधी मन एकाच ठिकाणी खूप वेळ रेंगाळतं सुद्धा.
अजब असतो हा मनाचा कारभार. जे पेराल ते उगवेल. म्हणूनच मनावर मनापासून प्रेम करावं . प्रसन्न ठेवावं. त्याला आणि स्वतःला आनंदात ठेवावं हेच श्रेयस्कर.