आप्पांना पाहिलं की या सगळ्या संज्ञा त्यांना तंतोतंत लागू होतात. " क्या खोया क्या पाया" या पलीकडे जाऊन निरपेक्ष वृत्तीने आपलं काम उत्तमपणे करणारे आप्पा. त्यांना भेटून आलं की एक सकारात्मक ऊर्जा मिळत असे. कायम गाण्यातच बुडालेला हा गानयोगी. कितीतरी आठवणी दाटून येतात त्यांच्याबद्दल बोलताना..आठवताना..
गळा तयार करून घेण्याची त्यांची स्वतःची एक पद्धत होती. आवाजाचा पोत ओळखून त्याप्रमाणे ते मेहनत करून घ्यायचे. स्वतः तबला वाजवून शिकवायचे. ही पण त्यांचीच खास पद्धत. राग- उलगडून दाखवून , बंदिशी बरहुकुम त्याची बढत करण्याची त्यांची हातोटी त्यांच्यासमोर बसून शिकणाऱ्या विद्यार्थ्यालाच कळत असे. कित्येक तासांची बैठक असायची. तरी कधी कंटाळा नाही शिकवण्याचा.
त्यांच्या बंदिशींच्या वह्या एक बघण्यासारखा ठेवा आहे. नोटेशन सकट वेगवेगळ्या शाईने , नीट आखून रेखून स्वहस्ते लिहिलेल्या वह्या बघून त्यांच्या उत्साह, नीट नेटकेपणा अगदी वाखाणण्याजोगा होता. त्यातून त्यांच्या विचारांची clarity दिसायची. तसंच त्यांनी जमा केलेल्या cassettes.. उस्ताद अमीर साहेबांच्या कितीतरी रेकॉर्डिंग्स त्यांच्याजवळ होते . .
मी सलग १२ वर्ष आप्पांकडे शिकले. अगदी तन्मयतेने शिकवायचे. मी आठवड्यातून ३ वेळा जायची . कितीतरी राग..बंदिशी शिकवल्या. त्यातलं सौंदर्य समजावून सांगितलं. पण कधीही रागावल्याचं मला तरी आठवत नाही. स्वतःचा सांगीतिक ठेवा अगदी मुक्तहस्ते विद्यार्थ्यांना दिला. लग्नानंतरही जेव्हा नागपूरला जात असे तेव्हा अप्पांकडून काहीतरी शिकूनच यायचे. माझा आवाज थोडा त्रास देत होता त्या काळात मार्गदर्शन करून मेहनत करून घेतली. माझ्या AIR च्या upgradation च्या आदल्या दिवशी राग गाऊन घेतले. अनेक competitions साठी माझ्याबरोबर असायचे. त्यांनी मुलीसारखं नाही तर मुलगी म्हणूनच कायम वागवलं. ते माहेरपण त्यांच्या सगळ्या घरच्यांनी पण विशेष जपलं. कायम कौतुक केलं.
बंदिशकार म्हणूनही आप्पाचं योगदान remarkable आहे. तबल्याची उत्तम जाण आणि उत्तम वादक असल्यामुळे वेगवेगळ्या वजनाच्या बंदिशी त्यांनी बांधल्या. समजून घेताना आमची धांदल उडायची. त्या बंदिशींमध्ये सगळे रस असायचे. " जावो जी जावो (बिहाग)" , " दामनवा लागी (अहिर भैरव)", " मोपे डारो ना(पटदीप)"," झनन बाजे (गावती )" यासारख्या कितीतरी बंदिशी .. त्याचबरोबर " श्यामल नयना " सारखी अत्यंत कठीण पण सुश्राव्य अशी composition म्हणजे निव्वळ आनंद. त्यांच्या बंदिशींच रसग्रहण हा फार मोठा विषय आहे.
असणं आणि नसणं यात फार मोठी तफावत असते. कुठलीही चांगली घटना घडली की आप्पांना फोन करायचा. हि कित्येक वर्षांची सवय... आता जड जाणार.. नागपूरला गेल्यावर आप्पा नसणार.. हेही कठीण जाणार... वय आणि म्हातारपण बघता हे कधीतरी होणार हे माहीतअसूनसुद्धा.. काहीतरी या जगात अमर असावं अशी वेडी आशा ... त्यांच्या जाण्यानं लागलेली हुरहूर.
माझ्यासारख्या अनेक विद्यार्थ्यांचा संगीत विश्व् व्यापून राहिलेल्या या चिरतरुण गानयोग्याला साष्टांग नमस्कार...मोक्षाकडे जातानाही नवीन बंदिश बांधून आणि भैरवी ऐकून जाणारा ही आनंदी व्यक्ती शोधूनही सापडणार नाही...
आमच्या आप्पांना हळुवारपणे जपणाऱ्या त्यांच्या कुटुंबीयांप्रती कृतध्यता...
आकाशातून आमच्याकडे नजर असू द्या हं आप्पा !.
असणं आणि नसणं यात फार मोठी तफावत असते. कुठलीही चांगली घटना घडली की आप्पांना फोन करायचा. हि कित्येक वर्षांची सवय... आता जड जाणार.. नागपूरला गेल्यावर आप्पा नसणार.. हेही कठीण जाणार... वय आणि म्हातारपण बघता हे कधीतरी होणार हे माहित असूनसुद्धा.. काहीतरी या जगात अमर असावं अशी वेडी आशा ... त्यांच्या जाण्यानं लागलेली हुरहूर.