हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत अनेक अंगांनी सजवलं गेलं. ख्यालगायन, ठुमरी, दादरा , नाट्यगीते यातून ते फुलून आलं. निरनिराळ्या दिग्गजांनी त्यावर विचार केला. त्यात वेगवेगळे विचारप्रवाह आणले. अनेक विचारवंत, शिक्षक , गायक आणि गायिकांनी ते समृद्ध केलं. मुळात भारतीय असलेलं धृपद गायन मुसलमानी अमलानंतर हिंदुस्थानी संगीत ख्यालगायनाकडे वळलं. मुसलमानी पडदा पद्धतीप्रमाणे संगीत देखील पडद्यात राहिलं. घटकाभराच्या करमणुकीसाठी राजे राजवाड्यांच्या जनानखान्यात हे गाणं रुजू लागलं .पण त्याला सगळ्यांसमोर गायची मनाई होती. विशेषतः स्त्रियांनी सुरुवातीच्या काळात स्त्रियांसाठी निषिद्ध मानलं गेलेलं संगीत हळू हळू घराघरातील स्त्रियांच्या ओठी आलं. आणि केवळ घरापुरतं सीमित न राहता स्टेजवर स्त्रियांकडून शालीनतेनी मांडलं गेलं. आणि बऱ्याच जणींकडून करिअर म्हणूनही घडवलं गेलं. शिक्षणासाठी जसा स्त्रियांना संघर्ष करावा लागला त्याचप्रमाणे गाणं करण्यासाठी पण प्रस्थापित व्यवस्थेविरुद्ध संघर्ष करावा लागला.
परंतु जसजसं स्त्रियांनी शिक्षण घ्यायला सुरुवात केली तसतशा त्यांच्या जाणिवा पण सजीव झाल्या. आणि अभिजात संगीत ही काही केवळ पुरुषांनी करण्याची गोष्ट उरली नाही. सुरुवातीला आपल्या वडील-भावांकडे आणि नंतर गुरूंकडे शिकत शिकत हे गाणं स्त्रियांकडून मंचावर विराजमान झालं. आणि लोकांची त्याकडे बघण्याची दृष्टी पण बदलत गेली. ती केवळ करमणूक न राहता त्यातला स्त्रियांचा बुद्धिवादी आणि सौंदर्यपूर्ण विचार पुढे येऊ लागला.
सुरेशबाबू माने यांच्याकडे किराणा घराण्याची रीतसर तालीम घेऊन हिराबाई बडोदेकर यांनी शालीनतेनी दोन्ही खांद्यावर पदर घेऊन आणि हातात तंबोरा घेऊन जाहीर सभांमधून स्वतःचं अस्तित्व प्रस्थापित केलं. आणि स्त्रियांच्या अनेक पिढ्यांचा मार्ग सुकर केला. तालीम ही पुरुष गायकांमुळे घेतल्यामुळे त्यातले स्वरलगाव पुरुष गायकांसारखे होत असत. पण हिराबाईंनी हा स्वरलगाव feminine होईल यासाठी विशेष लक्ष दिले. त्यामुळे " कवन देस गये" हा मुलतानीतील ख्याल किंवा यमन मधली "सुगर बना " आणि " मोरी गगर ना भरन देत" हे ऐकताना एका स्त्रीचंच गाणं ऐकतो आहोत असं वाटतं. संपूर्ण आकारयुक्त बढत असली, थोडी जलद लय असली तरी त्यातल्या हरकती स्त्रीसुलभ सौंदर्याने परिपूर्ण आहेत.
"ए मोहब्बत तेरे अंजाम पे रोना आया " अशी भावपूर्ण ठुमरी गाणाऱ्या बेगम अख्तर यांनी झंडे खान यांच्याकडून तालीम घेतली. वयाच्या केवळ १५व्या वर्षी श्रीमती सरोजिनीदेवी नायडू यांनी त्यांना "बिहार-नेपाळ भूकंपग्रस्त लोकांसाठी १९३४ मध्ये कार्यक्रमासाठी निमंत्रण दिले. यातून प्रेरणा घेऊन त्यांनी गझल, ठुमरी,दादरा असे प्रकार मंचावर गाऊन लोकप्रिय केले. मेगाफोन रेकॉर्ड कंपनीने त्यांची रेकॉर्डही काढली. "मल्लिका ए गज़ल " अशी ही गायिका स्वकष्टाने लोकांच्या मनावर राज्य करू लागली. जाहीर सभांमधून गाऊ लागली.
१८९२ मध्ये जन्मलेल्या केसरबाई केरकर वयाच्या ८व्या वर्षी अब्दुल करीम खान यांच्याकडे गाणं शिकण्यासाठी गोव्याहून कोल्हापूरला आल्या. केसरबाई म्हणजे शास्त्रीय संगीतातील एक अनोखं व्यक्तिमत्व. त्यांनी रामकृष्णबुवा वझे, भास्करबुवा बखले आणि नंतर जयपूर अत्रौली घराण्याचे अल्लादिया खान यांच्याकडे रीतसर तालीम घेतली. गाणं करण्यासाठी वयाच्या १६व्या वर्षी त्या त्यांच्या आईबरोबर मुंबईत आल्या. आपण गाणं कुठे, कोणासमोर आणि कसं सादर करायचं याबाबत त्या फार जागरूक होत्या. त्यामुळे त्यांचं फार कमी काम रेकॉर्ड झालंय " पद्मभूषण " असलेल्या केसरबाईंना त्याकाळी "संगीत नाटक अकादमी " पुरस्कार ही मिळाला होता.
एका शेतकरी कुटुंबात जन्म घेतलेल्या गंगुबाई हंगल. गाण्याचा ध्यास घेतलेल्या गंगुबाईनी सवाई गंधर्वांची तालीम घेतली. मुळातच ढाला असलेला गंगुबाईंचा आवाज तालमीमुळे आणखीनच पुरुषी वाटायचा. पण ही लहानशी मूर्ती जेव्हा मंचावर जाऊन षड्ज लावायची तेव्हा सगळे श्रोते एका वेगळ्या पातळीवर जायचे आणि मंत्रमुग्ध व्हायचे. त्यांच्या परिवारात गाणं करणं हे गौण मानलं जायचं परंतु प्रवाहाविरुद्ध जाऊन त्यांनी जिद्दीने आपलं करिअर घडवलं आणि एक इतिहास रचला.
"कौसल्या सुप्रजा रामा.." हे स्तोत्र ऐकून अजूनही सकाळ प्रसन्न होते. "व्यंकटेश स्तोत्र", "विष्णू सहस्त्रनाम", "हरी तुम हरो " अशी स्तोत्र गाऊन घरा - घरात पोहोचलेल्या एम एस सुब्बलक्ष्मी. साध्या सोज्ज्वळ आणि गाण्याला पूजा मानणाऱ्या सुब्बालक्ष्मी या " भारत रत्न " मिळवलेल्या पहिल्या गायिका होत्या. " रमन मॅगसेसे " पुरस्काराने सन्मानित होत्या. "युनाइटेड नेशन्स जनरल असेम्बली " मध्ये गाणाऱ्या पहिल्या भारतीय महिला कलाकार होत्या.
अनोख्या गुरु-शिष्याची जोडी म्हणजे मोगुबाई कुर्डीकर आणि अल्लादिया खान यांची. "जोवर तू प्रसिद्ध अशी गायिका होणार नाहीस तोवर माझा आत्मा शांत होणार नाही" मोगूबाईंच्या आईने त्यांच्याकडून गाणं करण्याबद्दल वचन घेतलं. एकदा सांगलीला एका मंदिरात गात असताना त्यांना अल्लादिया खान यांनी ऐकलं आणि गाणं शिकवण्याची तयारी दाखवली. कोल्हापूरचे राजगायक असलेले अल्लादिया खान यांच्याकडून हवी तशी तालीम त्यांना मिळत नव्हती कारण तोपर्यंत मोगुबाई लग्न होऊन मुंबईत स्थिरावल्या होत्या. परंतु नंतर हे गुरूच शिष्येसाठी मुंबईत आले आणि मोगूबाईंना जयपूर-अत्रौली घराण्याची तालीम मिळाली.
स्वातंत्रपूर्व काळात जन्मलेल्या या सगळ्या स्त्रियांनी अतिशय कष्टाने संगीत विद्या मिळविली. अपुऱ्या दळण - वळणाच्या साधनांमुळे गावोगावी खडतर प्रवास केले. पुरुष कलाकारांपेक्षा कमी बिदागीत आपली कला सादर केली. त्या ब्रिटिशकालीन भारतात अनेक सामाजिक बंधनांना सामोऱ्या गेल्या. परंतु अत्यंत जिद्दीने, संगीताची पूजा बांधून मंचावर आपली कला सादर केली. त्याला एक प्रतिष्ठा मिळवून दिली. त्यातलं पावित्र्य लोकांसमोर आणलं. अनेक स्त्री पिढ्यांचा मार्ग सुकर केला. वडील-भाऊ-गुरु यांचा भक्कम पाठिंबा तर होताच परंतु त्यांची स्वतःची गाण्याप्रती निष्ठा वादातीत होती.
आज अनेक स्त्री कलाकार अत्यंत आत्मविश्वासाने आपली कला मंचावर सादर करतात. संसार,इतर व्यवसाय सांभाळून निष्ठेने गाणं करतात. त्यात करिअर करतात. या सगळ्यासाठी लागणारा पाया या स्वातंत्र्यपूर्व काळात भक्कमरित्या ठेवला गेला. आम्ही सर्व जणी त्यासाठी त्यांच्या ऋणी राहू. जागतिक महिला दिनानिमित्त आमच्या पिढीतर्फे या सगळ्यांना सलाम.