काही लोकांचा जरी रोजच्या जीवनात प्रत्यक्ष संबंध आला नाही तरी त्यांचा प्रभाव कायम आपल्यावर राहतो. निर्व्याजपणे कोणी आपल्यावर स्नेह करतं, प्रोत्साहित करतं, सकारात्मक राहण्यासाठी प्रेरणा देतं. अशीच एक व्यक्ती माझ्या आयुष्यात ही आली ती म्हणजे विश्रामजी जामदार.
देवपुजारींकडे संस्कार भारतीच्या गीतांच्या तालमी चालायच्या. आम्ही सगळे सम विचारी आणि गाण्यामुळे एकत्र आलेलो. साधारण सारख्या वयाचे. सुमंता आमचे संगीत दिग्दर्शक. उत्तम violine वाजवायचे. बहुत करून भय्याजी सामकांच्या चाली. वेगवेगळ्या भाषांमधली गाणी. प्रॅक्टिस जोरात चालायची आणि त्याचबरोबर भरपूर चहा. खूप त्रास द्यायचो आम्ही वहिनींना. याच संस्कार भारतीच्या निमित्ताने विश्रामजींची ओळख झाली . पुढे गाढ स्नेह आणि ऋणानुबंध जुळला. पहिल्याच भेटीत अतिशय प्रसन्न असलेले विश्रामजी आपलेसे वाटू लागले. त्यात माझ्या बाबानी त्यांना शिकवलं होतं. त्याचा उल्लेख ते सतत आदराने करायचे. अनेक कार्यक्रमातील त्यांचा सहभाग, गप्पा गोष्टी आणि खूप मजा. आम्ही सगळे तर शिकत होतो पण त्यांचा स्वतःचा व्यवसाय होता. तो सांभाळून ते या सगळ्या उपक्रमात उत्साहाने सामील व्हायचे.
मला आठवतं त्यांच्या घरी आम्ही बरेचदा जेवायला पण जायचो. इतक्या सगळ्यांचा स्वयंपाक काकू स्वतः करायच्या. आम्ही कधीही टपकायचो त्यांच्या घरी. खूप आत्मीयतेने चौकशी करायचे, खूप कौतुक करायचे आणि प्रोत्साहन द्यायचे. योग्य सल्ला द्यायचे. लग्न झाल्या वर नागपूर सुटलं. भेटी-गाठी कमी झाल्या. पण नागपूरला गेल्यावर थोड्या वेळ का होईना सगळ्यांना भेटायची फार इच्छा असायची. प्रत्येक वेळी जमायचंच असं नाही. त्यावेळीही GT साठी विश्रामजी असायचे. वेळ काढून यायचे. एकदा अचानक मुंबई-नागपूर ट्रेन मध्ये पण भेट झाली. खूप गप्पा झाल्या. गेल्या वर्षी IIT मध्ये आले असताना बोलणं झालं . "पुढल्या वेळी तुझ्या घरी नक्की येईन " असं आश्वासन ही दिलं. लहान-सहान गोष्टींचं मनापासून कौतुक करायचे. सदिच्छा पाठवायचे. He was a father figure to me. बाबांच्या "हिंदी दासबोधाच्या " प्रकाशन समारंभाला आले. भरभरून बोलले. एक आमच्याच परिवारातले सदस्य होऊन आले. पराग कडे माझ्या गाण्याला आवर्जून आले. त्यांना भेटल्यावर मध्ये बराच काळ गेलाय असं कधीच वाटायचं नाही. पटकन कनेक्ट व्हायचे.
आणि.. अचानक निघून गेले. कायमची हुरहूर लावून. त्यांचा हसतमुख आश्वस्त चेहरा डोळ्यासमोरून जात नाही. आता कोण म्हणेल " फार गुणी पोर आहे ही "