महाभारताची युद्धभूमी.. दोन्हीकडे एकाच कुळातली, एकत्र वाढलेली, एकत्र खेळलेली पात्र. एकाने धर्माची तर दुसऱ्याने अधर्माची बाजू घेतलेली. दोन्हीकडे योग्य आणि अयोग्य वागणारी पात्र. चांगलं आणि वाईट याची सीमारेषा फारच पुसट. पहिल्या दिवसापासूनच भगवान श्रीकृष्ण जिकडे तिकडेच विजयश्रीची माळ पडणार हेही अनेकांना ठाऊक होतं. दुर्योधन, शकुनी यांच्या महत्वाकांक्षेमुळे केवळ युद्ध होत होतं आणि पुत्रप्रेमापुढे हतबल झालेला धृतराष्ट्र या युद्धाला पाठिंबा देत होता. संजयाकडून समाचार ऐकत होता. महाभारतात प्रत्येक कथेमागे एक उपकथा दडलेली आहे
या सगळ्यामध्ये सुरुवातीला कौरवांचं नेतृत्व करणारे पितामह भीष्म . काय मानसिक अवस्था असेल. आपले नातू एकमेकांपुढे ठाकले आहेत. युद्धानंतर काहीही शिल्लक राहणार नाही हे तर त्यांना ज्ञात होतंच. तरीदेखील त्यांची निष्ठा हस्तिनापूरच्या सिंहासनापाशी असल्याने ते कौरवांचं नेतृत्व करत होते. अतिशय पराक्रमी असा हा योद्धा म्हणजे तेज आणि ओज यांचा परिपाक. सुरुवातीपासूनच राजवैभव बघत असलेला पण ते उपभोगासाठी नाही तर त्याचं रक्षण हेच जीविताचं फलित मानणारा.
भीष्माचं आयुष्य काही साधं सोपं सरळ नव्हतं. पदोपदी नवीन आव्हानं पेलत त्याने वाटचाल केली. तो तसा निःसंग होता. प्रपंचात राहूनही अलिप्त होता. कर्तव्याला कुठे चुकला नाही. कष्ट फार केलेत पण. दिवसेंदिवस तो आणखीनच विचारशील आणि आत्ममग्न होत गेला.आपलं अस्तित्व कशासाठी याचा विचार फार करत असे तो. राजधर्म आणि राजदंडाचं रक्षण करण्यासाठी तो गृहस्थाश्रमाची पायरी कधी चढला नाही.नीर-क्षीर वृत्तीने हस्तिनापूरची सतत सेवा केली. द्रौपदी वस्त्रहरण ह्या समस्त मानव जातीवरच्या कलांकाचा दुर्दैवी साक्षीदार झाला. तो अजिंक्य आणि अभेद्य होता हे सगळ्यांनाच माहीत होतं. म्हणूनच दुर्योधनाने त्यांची निर्भत्सना करून युद्ध भूमीवर त्यांना पाठवले. इच्छामरणाचं वरदान लाभलेला हा योगी होता. बाणांची शय्या करून त्यावर युद्ध संपेपर्यंत पडून राहिला.
जेव्हा भीष्माचार्यांची कथा सांगितली जाते तेव्हा अंबा, अंबिका आणि अंबालिका यांची ही उपकथा ओघानेच येते. एका स्त्रीवर अनावधानाने अन्याय केला आहे आणि तेच शिखंडी च्या रूपाने त्याच्या अंताचं कारण असणार हेही त्याला पुरेपूर ठाऊक होतं. तरी संपूर्ण आयुष्य भीष्म निर्मोही होता. कर्त्यव्य दक्ष होता. मार्गदर्शक होता. सत्याची कास धरणारा होता.
महाभारत हे प्रत्येक काळात relevant आहे. अशा निर्मोही, निःसंग कुटुंब प्रमुखाची प्रत्येक कुटुंबात गरज असते. कुटुंब एकत्र आणि गुण्या गोविंदाने राहावं अशी मनापासून कळकळ असते त्याला. ती व्यक्ती प्रत्येकासाठी झटणारी असते. प्रसंगी खडे बोल सुनावणारी, सगळ्यांवर माया करणारी, सत्याची कास धरणारी. आपल्या वागण्यानेच आदर्श घालून देणारी. गरज असते ती त्या व्यक्तीला योग्य तो मान द्यायची. माझ्या भोवती अशी अनेक माणसं आहेत. तुम्ही पण शोधताय ना?
ती व्यक्ती प्रत्येकासाठी झटणारी असते. प्रसंगी खडे बोल सुनावणारी, सगळ्यांवर माया करणारी, सत्याची कास धरणारी. आपल्या वागण्यानेच आदर्श घालून देणारी. गरज असते ती त्या व्यक्तीला योग्य तो मान द्यायची. माझ्या भोवती अशी अनेक माणसं आहेत. तुम्ही पण शोधताय ना?
2 Comments
अप्रतिम…. खुप सुंदर विचार आणि लिखाण…
मीनल… तुझे लिखाण मला फार आवडते.. विचारांना खूप खोली आहे.. आणि त्यातून तुला हवं असलेलं नेमकेपणाने तू वाचकांपर्यंत पोहचवतेस..
तुझं गाणं पण मला आवडतं… तुझा आवाज पण छान आहे.. आणि मुंबईतलं एवढं व्यस्त जीवन सांभाळून तू तुझा “रियाज” नियमित करतेस.. याचे खूप कौतुक वाटते..
तुझ्या पुढील लेखाची आतुरतेने वाट बघते आहे.