अगदी प्राथमिक अवस्थेमध्ये शिकलेला भूप हळूहळू कठीण होत जातो कारण त्याच्या ५ स्वरांमध्ये खूप आवाका आहे. अवकाश आहे. यमन पण तसाच. गायला कठीणच की. प्रत्येक वेळी नवीन छटा घेऊन येतो. ' अरे मला यातून हे म्हणायचं होतं का ' असा स्वतःलाच विचारावं लागतं यमन गाताना. भीमपलासी पण पाकात घोळाल्यासारखा गोल गोल आणि गोड़ राग आहे. दुर्गा रागाची आर्तता काही वेगळीच.
खरी गायकी २ स्वरांमधल्या जागा कशा भरल्या जातात यावरच ठरते. ठिपक्यांची रेखीव साचेबद्ध रांगोळी काढायची की वळणदार रेषांची नक्षी काढायची. हा तो गायकीतला फरक. लालित्य हा बंदिशीचा स्थायीभाव असला तरी काही रागांमध्येच एक रांगडेपणा असतो. अडाणा , नायकी कानडा कसा लालित्यपूर्ण गाणार? त्यात रांगडेपणाचं हवा.
प्रत्येक राग मांडायचा एक धोपटमार्ग आणि एक ' हटके ' मार्ग असतो. पण 'नायकीतून' 'गायकीकडे जातानाचा प्रवास फार लांब आहे. हाच फरक शास्त्र आणि कला यात असतो. शास्त्रीय गाणं कलात्मकतेनं सजवलं तर गायकी तयार होते.
बंदिश सजवणं ही खरी कला. आमचे एक गुरु म्हणायचे " एका स्त्रीच्या अंगावर एकाचवेळी सोन्याचे,मोत्याचे, खड्याचे दागिने चांगले दिसतील का? तशाच प्रमाणे प्रत्येक बंदिशीचा " साज" आणि "बाज " वेगळा असतो. त्यासाठी योग्य तालीम आणि रियाजाची गरज असते.
तालीम आणि रियाझ यातही अंतर आहे. रियाजाची समज यायला तालीम फार आवश्यक.
" काय करू नये" हे तालमीतून नक्की समजतं आणि "काय जास्त करायला हवंय" हे रियाजातून उमगतं. रागाला किंवा स्वराला बंधनातून मुक्त करून रसरंजन करणे म्हणजे तालमीतून रियाजाकडे जाणारा प्रवास . "मला हे जमायला पाहिजे" असा सतत ध्यास लागणे हेच कलाकाराच्या जिवंतपणाचं लक्षण आहे. चिंतन हा रियाजाचाच भाग झाला. पण स्वर तरी साधतो का हवा तसा ?
साधतोय असं वाटत असतानाच हुलकावणी देतो. कधी आश्चर्यचकित करून सोडतो. कधी "आपल्याला जमलंय की " असं वाटत असतानाच उगाच भरकटतो. म्हणायला अनंत प्रवास करून आलेला तर कधी अगदी जवळ असलेला..सोबत्यासारखा. कधी कायम रुसलेला तर कधी मुक्तपणे विहार करणारा. स्वर म्हणणं म्हणजे गाणं नाही तर रागचित्र तयार करणं म्हणजे गाणं. स्वर असतो गळ्यात ..सूर निर्माण करायला पैलू पाडावे लागतात.
म्हणायला प्रत्येक स्वराला " श्रुती " असते. श्राव्य (सु) असा स्वर त्या त्या श्रुतीवर गेला तर त्याचा सूर होतो. त्यातलं शास्त्रही गहन आहे. physics चे अनेक सिद्धांत त्याला लागू होतात. प्रत्येक स्वराला २ ते ४ अशा श्रुती असतात. म्हणून प्रत्येक रागातील स्वर हा वेगळ्या श्रुतीवर असतो. म्हणून रिषभ मारव्यातला वेगळा आणि तोडीतला वेगळा. एक कारुण्य घेऊन येणार तर एक भक्ती घेऊन येणारा.
असा हा प्रवास "अणुपासोनि ब्रह्मांडाकडे" होत जातो. जितकं बीज सशक्त तितका त्याचा परिपाक उत्तम. तितकी त्याची मांडणी सुकर, सुबद्ध आणि सुश्राव्य. एखाद्याचा षड्ज ऐकल्यावरच trans मध्ये जायला होतं ते यामुळेच. एखादा राग तासंतास गाता येतो तर एखादा राग काही मिनिटात संपतो. पण कधी कधी थोडक्यातलं परिणाम करून जातो या प्रवासात आवाजाची तयारी हाही एक भाग आहे. गाता गळा असला की त्याचा पोतही बदलत जातो. आणि सूर पक्का होत जातो. आणि एकदा आवाजावर पकड आली की मग राग सुटत जातात. शास्त्राच्या पलीकडे जाऊन जाणवणारी ही स्पंदनं अधिकाधिक समृद्ध करत जातात... म्हणून "मन सूर को साध रे.."