whatsapp मुळे माणसं एका virtual वर्ल्ड मध्ये विसावली म्हणतानाच प्रत्यक्षात असणारी संवादाची भूक पण भागवायला लागलीत. लहानपणी सतत एकत्र असणाऱ्या मैत्रिणींचा एक ग्रुप तयार झाला आणि प्रत्येकीच्या आठवणींचे कप्पे पटापट उघडले. प्रत्येकीला धरमपेठच्या गल्ल्या दिसायला लागल्या . सुपेकरांकडे घातलेला धिंगाणा आठवायला लागला. होळीचं टाकं, गच्चीतले कार्यक्रम, शारदोत्सव, लहानपणीचे नाच , नाटकं, एकत्र बघितलेले रस्त्यावरचे pictures, TV आणि त्यावरचे प्रोग्रॅम्स ...लक्ष्मी नारायण मंदीर.. किती लडी उलगडायला लागल्या. नुसती धमाल.
आमच्या आळीत आम्ही साधारण १४-१५ मुली आणि २-३ च मुलं. लपाछपी, आंधळी कोशिंबीर, इलॅस्टिक, लगोरी,टिक्कर - बिल्ला असे खेळ जास्त खेळायचो आम्ही. बॅडमिंटन, क्रिकेट चा समावेश पुष्कळ नंतर झाला. आणि या सगळ्याला हक्काचं घर म्हणजे सुपेकरांचं घर. सकाळ,दुपार,संध्याकाळ कधीही.. आणि खेळून झाला की भिंतीवरून पुन्हा गप्पा. माझ्यापेक्षा माझ्या बहिणींचा गोतावळा जास्त होता. मी आपली त्यांच्या मागे मागे करायची. " माझ्यामागे पुच्छी सारखी येऊ नकोस " म्हणून बहीण दम भरायची. तरी आपण तिच्या मागेच.
हरितालिकेच्या आदल्या रात्री आवरण .म्हणजे आजचा pot luck किंवा डब्बा पार्टी . मग रात्री मेंदी काढायची. त्यासाठी झोप येत असताना सुद्धा जागत बसायचं. रात्री १२ वाजता वगैरे आपापल्या घरी जायचं . हरितालिकेला साड्या नेसून पूजा करायची. साबुदाण्याच्या उसळीसाठी उपास करायचा.
भुलाबाई ..हा अजून एक प्रकार. भुलाबाईची गाणी आणि खाऊ ओळखायची स्पर्धा. भारतात TV आल्यानंतर अख्या आळीत फक्त लातूरकरांकडेच TV होता. तोही ब्लॅक अँड व्हाईट. आम्ही सगळे lucy show आणि रविवारचा picture बघण्यासाठी जायचो त्यांच्याकडे . त्यांचा हॉल theatre व्हायचं.दिवाळीला फराळाच्या ताटांची देवाण घेवाण , दसऱ्याला घरोघरी जाऊन सोनं लुटायचं आणि चिवड्याच्या पुड्या जमा करायच्या.
दसऱ्याच्या दुसऱ्या दिवशी शारदा बसायची ५ दिवसांसाठी. " ओवाळू आरतीला . जय जय वाग्देवीला " अशी आरती सकाळ संध्याकाळ व्हायची. माझी आई फार सुंदर गायची ही आरती. साल्पेकरांकडची शारदा आठवते मला. मूर्ती फारच सुबक असायची. गणपतीपेक्षा या शारदेचं जास्त अप्रूप असायचं . आमची आई मंडळी नाटक बसवायची, आम्ही मुली पण नाटकं बसवायचो. गायचो. फुल्ल female डॉमिनेटेड असायचं हे सगळं. मांडव, सजावट सगळी साड्या , ओढण्या आणि crape च्या कागदांची.
आकाशवाणीचा बालविहार. या गोष्टीला आमच्या लहानपणात अनन्य साधारण महत्व आहे. सावदेकर काकू आणि सांबारे काकूंनी बसवलेली नाटक. त्याच्या तालमी. रेडिओ स्टेशन ची गाडी आणि रेकॉर्डिंग रूम मध्ये अनु काकू. कागदांचा आवाज ना करता live broadcast आणि मग सावदेकर काकूंकडचा फराळ. किती छान, सोपं आणि साधं होतं सगळं.
तशी भांडणं कमी व्हायची. पण झालीच तर एक मेडिएटर असायच
हळू हळू एकेकीचं लग्न झालं. धरमपेठ सुटलं. नागपूर पण सुटलं. WA ग्रुप मुळे परत सगळ्या आठवणी जाग्या झाल्या. जुने photos निघाले आणि जणू काही कालच सगळं घडलंय असं वाटायला लागलं. मधला २०-२५ वर्षांचा काळ जणू झर्रकन उडून गेला. आणि लक्षात आलं की किती समृद्ध होतं आपलं लहानपण. आपल्या अंगभूत गुणांची ओळख झाली ती या आळीतच या सगळ्या बालमैत्रिणी आणि आमच्या आई-काकूंच्या साक्षीनं.
भारतात TV आल्यानंतर अख्या आळीत फक्त लातूरकरांकडेच TV होता. तोही ब्लॅक अँड व्हाईट. आम्ही सगळे lucy show आणि रविवारचा picture बघण्यासाठी जायचो त्यांच्याकडे . त्यांचा हॉल theatre व्हायचं.