मागे एकदा कार्यक्रम आटोपून दादरहून घरी येत होते. रात्रीची वेळ होती. प्रचंड दमले होते. टॅक्सिवल्याने जुनी गाणी लावली होती.. कदाचित रेडिओच होता. मोहम्मद रफी, लताबाई, आशाबाई ऐकलं की तसंही छानच वाटतं.
मी सहज विचारलं " आपको गाने का शौक है क्या? अच्छे गाने लगाये है.."म्हणाला " हां ..मुझे पुराने गाने हि पसंद है.." म्हणाला" जुन्या गाण्यांचं lyrics मनाला भिडतं ...मीही फिल्म इंडस्ट्री त काम करत होतो. पण काही नीट जमलं नाही..म्हणून मग पोटा - पाण्यासाठी टॅक्सी चालवतो.." माझी उत्सुकता वाढत गेली...
पुढे म्हणाला " मी मशिदीत गातो..देवाची आळवणी करतो.." पुढे मी विचारलं " तुमच्या प्रार्थनेत काय मागता देवापाशी तुम्ही? " तर म्हणाला" आम्ही देवाचे आभार मानतो चांगलं आयुष्य दिल्याबद्दल.नवीन दिवसाचं स्वागत आणि दिवसाचा शेवट आम्ही प्रार्थनेनीच करतो.." पुढे त्याने त्याच्या प्रार्थनांचा अर्थ समजावून सांगितला ".
ऐकून वाटलं की हे सगळं तर आपल्याही धर्म सांगतो..किंवा इतरही धर्म सांगतात.. आचार आणि विचारांची शुद्धता..
त्याच दरम्यान एका विषयाचा अभ्यास करीत होते. धर्माचा वगैरे नाही पण आपल्याकडे म्हणजे महाराष्ट्र्रात संत-साहित्याची मोठी परंपरा आहे. "ज्ञानदेवे रचिला पाय..तुका झालासे कळस" ..असे म्हणतात. हे संत काव्य अनेक जणांनी गायले आहे. आपणही प्रयत्न करावा असे अनेक दिवसांपासून मनात होते. अनेक संत काव्य धुंडाळल्यानंतर निवडक ८ अभंग गायचे ठरवलं.
सगळी संत काव्य एकाहून एक सरस आणि अगदी ४ ओळीत सगळा गर्भितार्थ सांगणारे आहे. उच्च प्रतीचे काव्य मूल्य आणि शब्दांच्या व्याकरणाचाही योग्य विचार केलेले आहे. सगळे गेय आहेत. संगीतकारा नरेंद्र भिडे यांनी मनापासून छान चाली केल्या होत्या. त्यांच्या सुंदर चालींमुळे गातानाही छान वाटत होतं . त्या निमित्ताने आपली पुकार " त्या" च्यापर्यंत पोहोचवायचा प्रयत्न करीत होते.
संत जनाबाई, संत रामदास, तुकाराम,नामदेव आणि शेख महम्मद सुद्धा ..जनाबाईंना जात्यातलं पीठ करता करता विठ्ठलाची आठवण होते...रामदास स्वामींना विठ्ठलाच्या मूर्तीत राम दिसतो..एकनाथ महाराजांना लोणी काढल्यावर कृष्णाचा वावर सभोवती जाणवतो .तुकाराम महाराज विठ्ठलाच्या आठवणीने कासावीस होतात,
एकेक अभंग विश्लेषणाला घेतला तर त्यातून कितीतरी अर्थ निघतात. परंतु अध्यात्म समजावताना प्रापंचिक जवाबदार्यांचे भान ठेवायला सगळ्यांनीच सांगितले आहे. योग्यायोग्यतेचे निकष सांगितले आहेत. निसर्गाशी गट्टी करायला सांगितले आहे.
संत संगतीचे काय सांगू सुख ...आपण पारिखे नाही तेथे !