पावसाबद्दल लोकांच्या फारच रोमँटिक कल्पना असतात. काव्य स्फुरतं म्हणे पाऊस बघून. पण जेव्हा " मौसम मस्ताना..अज्जिबातच गरज नसताना " अशी अवस्था असते तेव्हा सगळे आपली प्रतिभा बासनात बांधून आज नेमकं रिक्षा -बसने घरी जायचं की बोटीने याचा विचार करतात.
काल अशी एक संध्याकाळ थोडी थ्रिल्लिंग पण थोडी घाबरावणारीसुद्धा अचानक समोर आली. कॉलेज मधील एक मीटिंग आटोपून ६ च्या सुमारास बाहेर आली तेव्हा परिस्थिती फारच बिघडली आहे याचा अंदाज आला. कुठलाही ओला उबेर वाला तयार नाही.. रिक्षा यायला तयार नाही . थोडं चालावं म्हटलं तर छत्री नाही . कारण सकाळी सूर्यदेवांचं मस्त दर्शन झालेलं . एक तासभर जेव्हा हा आटापिटा केला तेव्हा जरा काळजी वाटायला लागली. थोडं हेल्पलेस ही वाटायला लागलं .
तासाभरानंतर एक महाभाग रिक्षा न्यायला तयार झाले. एका विद्यार्थिनींबरोबर share केलं . तो रिक्षावाला " ट्रॅफिक रहेगा तो रस्ते मे छोड दूंगा" अशा धमक्या रस्ताभर देत होता . तसा हरफनमौला कारभार होता. एका मेट्रो स्टेशन पाशी त्याने मला सोडलं . मेट्रो स्टेशन ला तुफान गर्दी . घरी तर जायचं होतंच पण पोटातले कावळे स्वस्थ बसू देत नव्हते . मस्त maggi घेतली आणि आता मेट्रोत काय वाढून ठेवलंय याचा विचार करीत होते.
आपण रात्रभर हवेत नाही ना लटकणार अशी भीती पण वाटत होती . मग लोक कसे शिड्या लावून आपल्याला उतरवतील असा एक picture नजरेसमोर आणलं . पण जरा नशीब बरं होतं म्हणून train मध्ये जागा मिळाली.. चला १५ मिनिटांची निचंती .
मेट्रोतून उतरल्यावर परत तेच . पाऊस थांबतच नव्हता.. गच्च ओली झाल्यामुळे छत्री नाहीये याच अजिबात काही वाटेनासं झाला होतं . उतरल्यानंतर परत रिक्षा वाल्यांचा attitude . ' नही जानेका ' असा छानपणे लोकांना सांगत होते ते प्राणी . त्यांना आता अनन्यसाधारण महत्व प्राप्त झालं होतं कारण
आता मात्र आतली झाशीची राणी स्वस्थ बसू देईना. भर रस्त्यात ऐन ट्रॅफिक मध्ये रस्त्याच्या मध्ये जाऊन एका टॅक्सीच दार उघडून जाऊन बसले. " मैं घर जा रहा हूं .. आपको नही ले जा सक्ता " असा म्हणाला. असला नसलेला patience गोळा करून म्हटलं" ठीक है भैय्या, जहाँ तक छोड सकते हो वहां तक छोड दो " असं त्याला म्हटलं. एव्हाना माझी चालत जाण्याची मानसिक तयारी झाली होती. पण तो प्राणी जरा माणुसकी जपणारा होता. त्याला हळूच जेव्हा सांगितलं की माझं घर दोन किमी च्या आत आहे तेव्हा त्याने घरापर्यंत सोडलं.
अशी मजल दर मजल करत अडीच तासाने घरात पाऊल ठेवलं तेव्हा एकदम त्या विद्यार्थिनीचा विचार मनात आला. तिला फोन केला तेव्हा ती देखील पोहोचण्यात होती . हुश्श झालं.
अशी एक पावसातली संध्याकाळ. अचानक ओढवलेली. सगळ्या शायर , कवी लोकांची माफी मागून सांगते की अशी संध्याकाळ अज्जीबात रोमँटिक वगैरे नसते तर लोकांचे खरे चेहरे बघण्याची असते. BMC ला शिव्या देण्याची असते. आपल्या स्वार्थी लोकांची कीव करण्याची असते. आणि भारतात काहीही चालतं असं म्हणून जागोजागी कचऱ्याचे ढीग उभारणाऱ्या लोकांचं काय करता येईल याचा विचार करण्याची आहे.