जे जे उत्तम उदात्त उन्नत तसे आम्हा व्हायचे । उत्तुंग असे ते शिखर आम्हाला आहे गाठायचे ।
ही भूमिका घेऊन माधव काका आणि आशाताई खाडिलकर यांची " उत्तुंग" हि संस्था २१ वर्षांची झाली. त्या निमित्ताने मुंबईत एक छान मंगलमय आणि हृद्य कार्यक्रम झाला. गेल्या ११ वर्षांपासून मी या परिवारातील सदस्यांची तळमळ आणि कळकळ जवळून पहिली आहे. दरवर्षी आशाताईन्च्या घरात हा वार्षिकोत्सव म्हणजे एक लग्न असतं . केवळ मनोरंजनात्मक कार्यक्रम न करता सामाजिक बांधिलकी जपत समाजासाठी निस्पृहपणे काम करणाऱ्या माणसाना शोधून त्यांचे सत्कार " उत्तुंग" करते . समाज सहभागातून मिळालेल्या देणग्या त्यांच्या कार्यासाठी अर्पण करते . त्यांच्या कार्याचा आणि व्यक्तींचा गौरव करणारं मानपत्र देते.
किमान ५ तास चालणाऱ्या या कार्यक्रमच शिस्तबद्ध आयोजन आणि नियोजन माधव काका आणि आशाताई करतात आणि ह्या त्यांच्या प्रयत्नात " उत्तुंग" परिवारातील सर्व सदस्य तन-मन - धनानी झटतात. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे ह्या सगळ्यांच्या चेहऱ्यावर एक समाधान आणि आनंद असतो. ताण किंवा कंटाळा नसतो. प्रत्येकाचं स्वागत आणि विचारपूस ही मंडळी अगदी आत्मीयतेने करतात आणि यातच "उत्तुंग" च यश दडलेलं आहे. वेदश्री आणि ओंकार ही या दिंडीत रमताना दिसतात.
स्वतःच्या जगण्याबरोबर इतरांचाही विकास, आदर आणि सन्मान व्हावा हे साधं परंतु कठीण तत्व अंगीकारून २१विशी पार केलेल्या या संस्थेला असाच भरघोस प्रतिसाद मिळो. आशाताई आणि माधवरावांना असाच टवटवीत ठेवो आणि त्यांचा आशीर्वाद माझ्या पाठीशी सतत राहो हीच ईश्वरचरणी प्रार्थना.