सात सुरांची जादू … अथांग … विशाल …न संपणारं आकाश… ज्याचा जसा उगम माहिती नाही तसा अंतही नाही… प्रत्येक सुराचं म्हणणं वेगळं. व्यक्त होण्याची पद्धत निराळी. भास-आभास वेगळा. कुठल्याही सुरावटीत स्वत्व टिकवण्याची ताकद असणारे हे सूर.. तरीही एकत्रितरीत्या मांडल्यावर एक आकार मिळतो. जे कानाला गोड वाटतं ते मनालाही आनंद देतं … किती अविष्कार. किती प्रकारची अभिव्यक्ती…
लहानपणापासून ही जादू अनुभवायला मिळणं हे माझं भाग्य . आयुष्यात एक शांतता या सुरांनीच दिली. सकारात्मक विचार करण्याची शक्ती या सुरांनी दिली. जीवन समृद्ध करण्याच सामर्थ्य या सुरांनी दिलं. कित्येक वर्षांपासून सुरु असलेला हा अभ्यास, तरीही थांग न सापडलेलं हे विश्व.. नवीन राग शिकताना किंवा आधी शिकलेला नव्याने शिकतानाही खूप काही सापडत जातं.
लौकिक बाबी बाजूला ठेवून यातला निर्भेळ आनंद अनुभवायला मिळावा. अभ्यासाचा भाग बाजूला ठेवून साधनेच्या दिशेनी पाऊल पडावं. स्वतःचाही नकळत एखादी सुरावट गळ्यातून उमटावी.
पण एका जन्मात पूर्ण नं होणारं हे व्रत. पार न पायो …नाद भेद को विस्तार घन भयो …
पण तरीही प्रत्येकानं आपलं गाणं गावं. स्वतःमध्ये रमावं. स्वतःला शोधावं.स्वतःला विसरावं. अज्ञात अशा त्या अनंताकडे झेप घ्यावी.