अनेक वर्षांच्या तपश्चर्येनंतर आलेलं चेहऱ्यावरचं तेज. कुठल्याच परतफेडीची अपेक्षा न करता केलेला व्यासंग आणि त्यामुळे आतून असलेली मनाची प्रसन्नता . संगीताविषयी तळमळ आणि नित्य काहीतरी "घडविण्याची" आस.. आप्पांना पाहिलं कि हे सगळं जाणवतं. आप्पा म्हणजे माझे गुरु श्री . आप्पासाहेब इंदूरकर . त्यांच्याकडे मी १२ वर्ष गाणं शिकली नागपूरला.
खूप दिवसांपासून मनात होतं कि नेहमी प्रसिद्धी परांग्मुख असलेल्या आप्पांचं काम लोकांसमोर यावं. त्यांना दाद मिळावी. त्यांच्या तपश्चर्येला लोकांचा सलाम मिळावा. विचार केला मला काय करता येईल? मग ठरवलं की आप्पांनी अनेक " बंदिशी"रचल्यात . अनेक " राग" निर्माण केलेत. त्याची एक ध्वनिमुद्रिका काढावी जेणे करून थोडं तरी काम एकत्रितरीत्या मांडता येईल. आपला " खारीचा वाटा" आपण उचलू या. मग मी आणि माझ्या तिघी मैत्रिणीनी मिळून १६ बंदिशींची एक CD तयार केली. ते करताना आम्हांला खूप आनंद मिळाला आणि आप्पानाही थोडं समाधान देऊ शकलो
कायम संगीतात बुडालेला हा ९१ वर्षाचा युवक CD विमोचानाच्या दिवशी प्रचंड उत्साहात, आनंदात होता. आम्हाला प्रोत्साहन देत होता . नवीन राग स्वतः गाऊन दाखवत होता. पांढरी ७ ला तार सप्तकात गाऊन सगळ्यांना अचंबित करीत होता. आणि " साधना" म्हणजे काय याची प्रचीती देत होता.
असा गुरु मिळायला भाग्य लागतं. आम्ही समस्त शिष्यवर्ग स्वतःला भाग्यवान समजतो. आयुष्यभर पुरेल अशी शिदोरी त्यांनी आम्हाला दिली आहे. त्याची उपासना आणि जोपासना करण्याची जवाबदारी आमचीच. आणि त्यासाठी आम्ही त्यांच्या कायम " ऋणात " राहू.
"श्री रंग राग " चा प्रवास आनंददायी होता. आम्हा मैत्रीणीना जवळ आणणारा होता. बरंच काही शिकवणारा होता आणि प्रेरणादायी होता. यात सहभाग असणाऱ्या सगळ्यांना सलाम.. एक समाधान मनाशी घेऊन त्यादिवशी नागपूर सोडलं.