निमित्त " प्रकाश वाटा " या पुस्तकाचं . भारावून टाकणारं काम आणि प्रचंड ध्येयासक्तीने पछाडलेले लोक. लौकिकार्थाने काहीही मिळणार नसताना आयुष्य उधळून लावताना किती घालमेल झाली असेल. किती यातना सहन कराव्या लागल्या असतील. किती मानसिक खच्चीकरण झालं असेल. स्वतःला झोकून देताना स्वतःशीच किती झगडावं लागलं असेल . बरं आधी माझं आयुष्य सुधारतो मग समाज कार्य असंही नाही. कमाल आहेत ही मंडळी. बाबा आमटेंच कुटुंब जगावेगळं.
पुस्तकात Dr. प्रकाश आमटे आणि Dr मंदा आमटे यांचा खडतर प्रवास, ध्येयवाद पानोपानी जाणवतो पण त्यात काही अभिनिवेश नहि. केवळ " कथन" आहे. परिस्थिती मांडली आहे. संघर्ष दाखवला अहे. पण " मी केलं " अशी प्रौढी नाही. फार वेगळी आहेत ही माणसं.
" आनंदवनात " जाऊन आलेय. आता हेमलकाशालाही जायचं पक्कं झालंय. आपला खारीचा वाटा आपणही उचलायला हवा. समाजाचं ऋण फेडावं अशा वातावरणात वाढलेलो आम्ही . आई बाबांची शिकवण रुजायला हवी. प्रकाश वाटा वाचताना हे भान पुन्हा आलं… समाज ऋण.