आई कायम मनातच राहिली आहे. एक वेगळा कोपरा तिच्यासाठी reserved आहे. आयुष्याचे दोन भाग आहेत. आई असतानाचं पण न कळतं आयुष्य आणि एक नसतानाचं कळत्या वयातलं आयुष्य. आयुष्यातल्या प्रत्येक क्षणी आई नसल्याचं दुःख, कमतरता कायम जाणवत राहिली आहे.
अतिशय हुशार, कर्तबगार,सोशिक पण आनंदी अशीच आई कायम नजरेसमोर आणि मनात असते. संसारात पूर्णपणे बुडालेली पण स्वतःचं अस्तित्व जपू पाहणारी आई लग्न झाल्यावर तर फारच भावली. फारसं भांडवल न करता तिने दिलेला support आठवतो. स्वतः अभ्यासू वृत्ती बाळगून घरात अभ्यासाचं वातावरण ठेवणारी आई आठवते. मुलगी असूनही स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठीचा तिचा ध्यास आठवतो.
लहान लहान गोष्टींमधला आनंद शोधणारी आई आठवते. स्वतःची लहानशी डायरी ठेवणारी आई आठवते. मोत्यासारखं तिचं अक्षर आठवतं. " आई " झाल्यावर तीव्रतेनी तिची आठवण तर आम्ही सगळ्यांनीच अनुभवली.
ती नव्हती, नाहीये …. पण ती सगळीकडे आहे, असते. प्रत्येक निर्णयाच्या क्षणी होती. प्रत्येक प्रसंगी होती. कारण ती खरंच "मनात " होती आणि आहे.
चांगलं आयुष्य जगण्यासाठी कष्ट घेतले पाहिजेत, स्वतःचा विकास करत राहिलं पाहिजे आणि अभ्यास करत राहिलं पाहिजे… ही तिची नकळत दिलेली शिकवण कायम लक्षात राहील…