अजून एक क्लेशदायक बातमी मिळाली. साने बाईना देवाध्न्या झाली. मला त्यांनी ३ वर्ष शिकवलं. अगदी प्राथमिक शाळेत १ली ते ३री. फारच लहान होतो आम्ही. पण साडी नेसून सायकल चालवत येणाऱ्या, केसात रोज फूल माळणाऱ्या , प्रसन्न मुद्रा आणि अतिशय सात्विक भाव असलेल्या सानेबाई अजूनही तशाच आठवतात. शिक्षिका म्हटलं की पहिला नंबर सानेबाईंचाच. त्यांनी काय शिकवलं आणि कसं शिकवलं खरं तर काही आठवत नाही. परंतु रोज ५ ओळी शुद्ध लेखनाच्या वहीत लिहायला सांगायच्या. एक पवित्रता, शुद्धता होती त्यांच्या वागण्या- बोलण्यात. मूल्य शिक्षण की काय म्हणतात ते त्यांच्या आचरणातून समजवायच्या. वाईट, खोटं बोलण्याची हिम्मतच नसायची. मोठ्या शाळेतही गेल्यावर सानेबाईंचं आपल्यावर लक्ष आहे असं वाटायचं.
याच वर्षी शिक्षकदिननिमित्त त्यांच्याशी बोलणं झालं. जवळपास ८० वर्षांच्या बाईंची स्मरणशक्ती अगदी व्यवस्थित होती. त्यांना खूप आनंद झालाय हे त्यांच्या बोलण्यातून जाणवत होतं. " आता एकदम पुढच्या वर्षी teacher's day ला फोन करू नकोस. घरी ये।" असं म्हणाल्या. पण माझ्याच उद्योगांमुळे त्यांची प्रत्यक्ष भेट होऊ शकली नाही याची खंत वाटतेय आणि वाटणार.
काही लोकांना वर्षात भेटलो नाही तरी त्यांची एक वेगळी जागा आपल्या मनात असते. तशी सानेबाईंची आहे.फक्त आता डोळ्यांनी दिसण्याची शक्यता पूर्णच मावळली. हळू हळू आयुष्यातले mentors कमी होत आहेत. स्वतःच्या पायावर उभे राहण्यास आपण समर्थ आहोत?